जळगाव समाचार | २१ एप्रिल २०२६
जळगाव शहरात पावसाळ्यापूर्व स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी एक धाडसी आणि अनोखी कृती करत भाऊंच्या उद्यान परिसरातील महानगरपालिकेच्या जलकुंभात प्रत्यक्ष उतरून पाहणी केली. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा मिळावा हा मूलभूत हक्क असल्याचे अधोरेखित करत त्यांनी कामाची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या उपक्रमामुळे प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.
सोमवारी दुपारी सुमारे चार वाजता महापौर दीपमाला काळे या सुमारे १०० फूट उंच जलकुंभावर पोहोचल्या. सुमारे २८ लाख लिटर क्षमतेच्या या जलकुंभाची पावसाळ्यापूर्व साफसफाई मोहीम सध्या राबविण्यात येत असून शहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचा त्यामागचा उद्देश आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महापौरांनी निसरड्या लोखंडी शिडीवरून टाकीत प्रवेश करत आतल्या परिस्थितीचा सखोल आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान प्रभागाचे नगरसेवक नितीन बरडे, रितिक ढेकळे तसेच पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता घृष्णेश्वर साळुंखे यांनीही जलकुंभात उतरून कामाची माहिती घेतली. टाकीतील गाळ काढणे, स्वच्छतेची प्रक्रिया आणि पाणी साठवण व्यवस्थेची स्थिती याचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. टाकीच्या आत दमट आणि त्रासदायक वातावरणात सात कर्मचारी स्वच्छतेचे काम करत असल्याचे निदर्शनास आले.
कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची दखल घेत महापौरांनी तात्काळ पिण्याचे पाणी व चहाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आणि त्यांच्या प्रामाणिक कार्याचे कौतुक केले. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व जलकुंभ पूर्णपणे स्वच्छ करण्यावर भर देण्यात येत असून आतापर्यंत तीन जलकुंभांची साफसफाई पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच ही मोहीम केवळ तात्पुरती न राहता डिसेंबर महिन्यात पुन्हा व्यापक स्वच्छता केली जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. या पाहणीवेळी नगरसेविका उज्वला बेंडाळे, नितीन सपके, प्रफुल्ल देवकर, रबियाबी अमजद खान यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

![]()




