जळगाव समाचार | २१ एप्रिल २०२६
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली व अलरीक इलेक्ट्रीकल्स यांच्या सहप्रायोजकत्वातून आयोजित जळगाव क्रिकेट लीग (JCL) टी-२० स्पर्धेला कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेस मैदानावर चांगलाच प्रतिसाद मिळत असून सोमवारी झालेल्या सामन्यांमध्ये पाचोरा एसकेटी योद्धाज आणि चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर यांनी विजय मिळवला, तर रविवारी रात्रीच्या लढतीत जामनेर सातपुडा हिरोज संघाने दमदार कामगिरी करत विजयाची नोंद केली. जिल्ह्यातील विविध भागांतील संघांचा सहभाग, खेळाडूंची स्पर्धात्मक कामगिरी आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे स्पर्धेचा रोमांच वाढत आहे.
सोमवारी झालेल्या प्रमुख सामन्यात जळगाव कोगटा किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ बाद १७५ धावा उभारल्या. सलामीवीर ओम भोसले याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना तो १८ धावांवर बाद झाला, तर जितेंद्र, अक्षय आणि विपिन हे फलंदाज लवकर बाद झाल्याने संघ ५ बाद ६९ अशा अडचणीत सापडला. मात्र पूर्वेश चौधरी आणि मनीष चव्हाण यांनी ७६ धावांची भागीदारी करत डाव सावरला. मनीष चव्हाणने ३५ चेंडूत नाबाद ५८ धावांची झंझावाती खेळी केली. प्रत्युत्तरात पाचोरा एसकेटी योद्धाज संघाने १७६ धावांचे लक्ष्य ७ गडी राखत पूर्ण केले. कैलास पाटील याने नाबाद ७७ धावांची शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला, तर सिद्धेश देशमुखने ५१ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात ६ धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत पाचोराने सामना आपल्या बाजूने झुकवला. दुसऱ्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने जामनेर सातपुडा हिरोजविरुद्ध १५८ धावांचे आव्हान १९.३ षटकांत ६ बाद १६२ धावा करत पार केले. अमेय कोळीने ४९ चेंडूत ६६ धावांची सामनावीर खेळी केली, तर साहिल गायकरने ४६ धावा करत महत्त्वाची साथ दिली.
दरम्यान, १९ एप्रिल रोजी झालेल्या रात्रीच्या सामन्यात जामनेर सातपुडा हिरोज संघाने रावेर रॉयल्सवर ६८ धावांनी एकतर्फी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत सातपुडाने २० षटकांत ७ बाद १८२ धावा केल्या. मितलेश चौधरीने नाबाद ७०, प्रद्युम्न महाजनने ४३ आणि योगेश तेलंगने ३१ धावांची खेळी करत संघाला भक्कम धावसंख्या दिली. प्रत्युत्तरात रावेर संघ २० षटकांत ९ बाद ११४ धावांवर रोखला गेला. शतायू कुलकर्णी, रामकृष्ण राठोड आणि ललित पाटील यांनी प्रत्येकी दोन बळी घेत निर्णायक भूमिका बजावली. स्पर्धेचे सामने काव्यरत्नावली चौक व नेहरू चौक येथे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपित केले जात असून प्रेक्षक मोठ्या संख्येने त्याचा आनंद घेत आहेत, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी दिली. २१ एप्रिल रोजी सकाळी जळगाव कोगटा किंग्स विरुद्ध रावेर रॉयल्स, दुपारी जामनेर सातपुडा हिरोज विरुद्ध अमळनेर सुहांस जायंट्स आणि सायंकाळी पाचोरा एसकेटी योद्धाज विरुद्ध चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर असे सामने रंगणार आहेत.

![]()




