जळगाव समाचार | २ ऑक्टोबर २०२६
महात्मा गांधी यांच्या अहिंसा, शांतता, स्वदेशी आणि सद्भावनेच्या विचारांची आजच्या काळात अधिक गरज असून, स्वदेशी, स्वच्छता, ग्रामविकास, पारंपरिक व्यवसायांचे जतन, श्रमदान आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा स्वीकार केल्यास सक्षम व सुजाण पिढी घडेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित अहिंसा सद्भावना शांती यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजित ही यात्रा लालबहादूर शास्त्री टॉवरपासून सुरू झाली. खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, उपवनसंरक्षक अधिकारी सौरेश सहाय, मनपा आयुक्त आदित्य जीवने, प्रांत अधिकारी योगेश कुमार मीणा, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, राजेंद्र मयूर, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डीन गीता धरमपाल, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी उपस्थितांना अहिंसेची शपथ दिली. दीपस्तंभच्या दिव्यांग कलाकारांनी ‘वैष्णव जन तो तेणे कहिए…’ हे गीत सादर केले.
लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून यात्रेला सुरुवात केली. पंडित नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. हेडगेवार चौक मार्गे यात्रा महात्मा गांधी उद्यानात पोहोचली. तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास सूतीहार अर्पण करून यात्रेची सांगता करण्यात आली. विविध शाळा व संस्थांमधील शेकडो विद्यार्थी आणि जळगावकर या यात्रेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी भारत माता, कस्तुरबा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासह राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. बैलगाडीवरील चरख्यावर अखंड सुतकताईचे सादरीकरण हे यात्रेचे विशेष आकर्षण ठरले.
रोहन घुगे यांनी गांधीजींच्या जीवनातील आत्मपरीक्षणाचा संदर्भ देत त्यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. गांधीजींनी आपल्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारून त्यांची पुनरावृत्ती होऊ दिली नाही. ‘माझे सत्याचे प्रयोग’ या पुस्तकातून त्यांनी जीवनातील अनेक प्रसंग मोकळेपणाने मांडले. सत्य, अहिंसा, स्वदेशी, सद्भावना, श्रमदान आणि स्वच्छता या मूल्यांचा त्यांनी केवळ प्रचार केला नाही, तर प्रत्यक्ष आचरणातून संदेश दिला, असे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा आजच्या पिढीने आदर्श घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात अनुभूती बालनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी शुभदा नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गांधीजी के बंदर हम’ हे गीत अभिनयासह सादर केले. अर्थम अथांग जैन, लिटसा मनीष जैन, आरव हर्षद जैन, अनायशा आशिष बन्सल आणि रचित कुणाल राजपूत यांनी सहभाग घेतला. ‘भारत की संतान’ या कार्यक्रमातून भारतीय संविधानाने मान्यता दिलेल्या १८ भाषांची विविधता, संबंधित प्रदेशांची वेशभूषा आणि संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. नरेंद्र वडगावकर यांनी कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त केले. विविधतेतून एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या सादरीकरणाला उपस्थितांचा प्रतिसाद मिळाला.
गांधी जयंतीनिमित्त आयोजित गांधीतीर्थ जिल्हास्तरीय सामूहिक देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. ग्रामीण आणि शहरी भागातील २६ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक ब. गो. शानभाग विद्यालयाने मिळविला. विजेत्या संघाला ११ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामीण विभागात धनाजी नाना माध्यमिक विद्यालय, खिरोदा प्रथम, विद्याभारती माध्यमिक विद्यालय, विरवाडे द्वितीय, र. सु. जैन विद्यालय, तोंडापूर, जामनेर तृतीय, तर एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, वावडदा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. शहरी विभागात ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल प्रथम, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल द्वितीय, अनुभूती इंटरनॅशनल स्कूल, शिरसोली रोड, जळगाव तृतीय, तर काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. गिरीष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

![]()






