जळगाव समाचार | १ ऑक्टोबर २०२६
हिमाचल प्रदेशातील मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या खूनप्रकरणातील फरार चार संशयितांना जळगावातील शनिपेठ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ताब्यात घेतले. हिमाचल प्रदेश पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पैसे संपल्याने आणि भूक लागल्याने मोबाईल विकण्यासाठी संशयित जळगावात उतरल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
हिमाचल प्रदेशातील मानपुरा पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक ८२/२०२६ अन्वये ३० सप्टेंबर रोजी मुकेश कुमार यांच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मुकेश कुमार आणि संशयित आरोपी एकत्र दारू पीत असताना बहिणीवरून झालेल्या शिवीगाळीच्या वादातून त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन मुकेश कुमार यांचा खून करण्यात आल्याचा संशय असून, त्यानंतर मृतदेह तलावात फेकल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर चारही संशयित दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता किसनपूर येथून निघाले. त्यानंतर ते अंबाला येथे पोहोचले आणि अमृतसर-मुंबई एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने प्रवास करू लागले. प्रवासादरम्यान त्यांच्याकडील पैसे संपल्याने तसेच भूक लागल्याने मोबाईल विकण्यासाठी ते जळगाव येथे उतरल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी शनिपेठ पोलिसांना दिली. दरम्यान, चारही संशयितांचे मोबाईल लोकेशन शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्याचे हिमाचल पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्याशी संपर्क साधून संशयितांची माहिती दिली.
हिमाचल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीची गंभीर दखल घेत डॉ. विशाल जयस्वाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन गुन्हे शोध पथकाला संशयितांचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत पोलिस पथकाने शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चौघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये चंदन कुमार, रोशन गोगल मुखिया, संतोष कुमार हे तिघे कुतुबपूर, जिल्हा मुझफ्फरपूर, बिहार येथील रहिवासी असून अजित कुमार हा पंडरक, पाटणा, बिहार येथील रहिवासी आहे.
या कारवाईची माहिती हिमाचल प्रदेशातील मानपुरा पोलिस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. खूनप्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईसाठी चारही संशयितांना हिमाचल प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे आणि शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, तसेच पोलिस कॉन्स्टेबल निलेश घुगे, नवजीत चौधरी, अमोल वंजारी, पराग दुसाने आणि रवींद्र साबळे यांच्या पथकाने केली.

![]()






