नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांनी जळगाव पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला…

 

जळगाव समाचार | २१ एप्रिल २०२६

जिल्हा पोलीस दलात आज पोलीस अधीक्षक पदाचा पदभार हस्तांतरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांच्याकडे अधिकृतरीत्या जिल्ह्याची सूत्रे सुपूर्द केली. या सोहळ्यास जळगाव पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी डॉ. महेश्वर रेड्डी यांना पोलीस दलाच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांनी केलेले नियोजनबद्ध प्रयत्न, गुन्हेगारीवर बसवलेला प्रभावी वचक आणि जनतेच्या हितासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचा उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली असून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जळगाव पोलीस दलाच्या परंपरेनुसार त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. आपल्या अनुभवाच्या जोरावर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सूचित केले. सर्वसामान्य नागरिकांना त्वरित व न्याय्य सेवा देणे हे प्राधान्य राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पदभार स्वीकारल्यानंतर श्रीकांत ढीवरे यांनी तातडीने विविध शाखांना भेटी देत कामकाजाचा आढावा घेतला व अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. आगामी काळात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here