JCL T-20 मध्ये रोमांच शिगेला; जामनेर, जळगाव, अमळनेर संघांचे दणदणीत विजय

 

जळगाव समाचार | २१ एप्रिल २०२६

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आणि अलरीक इलेक्ट्रिकल्सच्या सहप्रायोजकत्वातून सुरू असलेल्या जळगाव क्रिकेट लीग २०२६ (JCL T-20) स्पर्धेत रोमांच शिगेला पोहोचला असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यांमध्ये जामनेर सातपुडा हिरोज आणि जळगाव कोगटा किंग्स यांनी विजय मिळवला, तर त्यापूर्वी सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात अमळनेर सुहांस जायंट्सने बाजी मारली. जामनेर सातपुडा हिरोज आणि अमळनेर सुहांस जायंट्स यांच्यातील सामन्यात जामनेरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत अमळनेरचा डाव १९.५ षटकांत १५२ धावांत गुंडाळला. शुभम शर्मा (६०), रोहित भोई (३२) आणि यशवंत शिंदे (२२) यांनी झुंज दिली. प्रत्युत्तरात प्रद्युम महाजनच्या ६९ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर जामनेरने १७.४ षटकांत ८ गडी राखून लक्ष्य पार केले; रवींद्र (३१*) आणि क्रिषी (३०*) यांनी नाबाद साथ देत विजय निश्चित केला.

दुसऱ्या सामन्यात जळगाव कोगटा किंग्सने रावेर रॉयल्सवर सहज मात करत स्पर्धेतील आपला दमदार फॉर्म कायम ठेवला. रावेर रॉयल्सची फलंदाजी सुरुवातीलाच डळमळीत झाली असून यश नहर (९), तौसीफ मिर्झा (०) आणि संदेश (९) लवकर बाद झाले. त्यानंतर अशपाक शेख (४५) आणि प्रज्वल राजपूत (१७) यांनी डाव सावरत संघाला २० षटकांत १४३ धावांपर्यंत मजल मारून दिली. जळगावकडून जगदीश झोपे आणि बिपिन चावरे यांनी प्रत्येकी दोन बळी घेत प्रभावी मारा केला. १४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओम भोसलेच्या नाबाद ६४ आणि बिपिन चांगरेच्या झंझावाती ५२ धावांच्या खेळीमुळे जळगावने अवघ्या १५.१ षटकांत ३ गडी गमावून विजय संपादन केला. बिपिन चांगरे याला सामनावीर घोषित करण्यात आले.

दरम्यान, २० एप्रिल रोजी रात्री झालेल्या सामन्यात अमळनेर सुहांस जायंट्सने रावेर रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवला. अमळनेरने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ बाद २०१ धावांचा भक्कम डोंगर उभारला. रणजीत निकम (५५), मानव टीब्रेवाला (५४) आणि ऋषी यादव (३७) यांनी संघाला मजबूत पाया दिला. प्रत्युत्तरात रावेर रॉयल्सचा डाव २० षटकांत ७ बाद १६४ धावांवर मर्यादित राहिला; संदेश सुरवाडे (४७) आणि तुषार चोरडिया (४६) यांनी प्रतिकार केला. मोहंमद सैफने अचूक गोलंदाजी करत दोन बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात रणजीत निकम याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. सध्याच्या गुणतालिकेनुसार जामनेर सातपुडा हिरोज आणि जळगाव कोगटा किंग्स प्रत्येकी ६ गुणांसह आघाडीवर असून अमळनेर, चाळीसगाव आणि पाचोरा संघ २ गुणांसह स्पर्धेत कायम आहेत, तर रावेर रॉयल्स अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत आहे. बुधवार, २२ एप्रिल रोजी सकाळी रावेर रॉयल्स विरुद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज, दुपारी अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स आणि सायंकाळी जळगाव कोगटा किंग्स विरुद्ध जामनेर सातपुडा हिरोज हे सामने रंगणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here