जळगाव क्रिकेट लिग टी-२० मध्ये उपांत्यफेरीसाठी चुरस वाढली

 

जळगाव समाचार | २२ एप्रिल २०२६

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आणि अलरीक इलेक्ट्रीकल्सच्या सहप्रायोजकत्वातून सुरू असलेल्या जळगाव क्रिकेट लिग-२०२६ (JCL T-20) स्पर्धेत उपांत्यफेरी गाठण्यासाठी संघांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. बुधवारी झालेल्या सामन्यांमध्ये रावेर रॉयल्स, अमळनेर सुहांस जायंट्स आणि चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर या संघांनी विजय मिळवत स्पर्धेत आपले स्थान बळकट केले. सकाळच्या सामन्यात रावेर रॉयल्सने पाचोरा एसकेटी योद्धाजवर सात धावांनी मात करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला, तर दुसऱ्या सामन्यात अमळनेर सुहांस जायंट्सने चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरवर ६३ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

अमळनेर सुहांस जायंट्स आणि चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर यांच्यातील सामना अत्यंत रंगतदार ठरला. नाणेफेक जिंकून चाळीसगावने गोलंदाजी स्वीकारली असता अमळनेरकडून मानव टिबरेवाल (३९), ऋषी यादव (१०) आणि अजय पाटील (३४) यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत संघाला २० षटकांत १४७ धावांपर्यंत मजल मारून दिली. सतीश चतुर्वेदीनेही ११ चेंडूत २० धावांची झटपट खेळी केली. प्रत्युत्तरात चाळीसगावचा संघ अमळनेरच्या भेदक गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही आणि १६.३ षटकांत ८४ धावांवर गारद झाला. ओम मुंडेने एकाकी झुंज देत ३२ धावा केल्या, मात्र मोहम्मद सैफच्या प्रभावी गोलंदाजीपुढे इतर फलंदाज अपयशी ठरले. सैफने तीन महत्त्वाचे बळी घेत सामनावीर पुरस्कार पटकावला.

याच दिवशी झालेल्या दुसऱ्या सामन्यात रावेर रॉयल्सने १९.२ षटकांत १३० धावा उभारल्यानंतर पाचोरा एसकेटी योद्धाजला १२३ धावांवर रोखले. यश नहारने ३१ धावा आणि तीन बळींसह सर्वांगीण कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तसेच मोहम्मद नोमाननेही तीन बळी घेत महत्त्वाची साथ दिली. तत्पूर्वी २१ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने पाचोरा एसकेटी योद्धाजवर सहा गडी राखून सहज विजय मिळवला होता. साखळी फेरीतील दोन सामने शिल्लक असून २३ एप्रिल रोजी क्वालीफायर निश्चित होणार आहे. सध्या गुणतालिकेत जामनेर सातपुडा हिरोज आणि जळगाव कोगटा किंग प्रत्येकी सहा गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत, त्यामुळे आगामी सामने निर्णायक ठरणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here