दूध फेडरेशन रोडवर इलेक्ट्रिकल्स दुकानाला आग…

 

जळगाव समाचार | १० जुलै २०२६

 

शहरातील सत्यम पार्क परिसरातील सोपाननगर, दूध फेडरेशन रोडवरील दिनेश इलेक्ट्रिकल्स या दुकानाला शुक्रवारी (१० जुलै) सकाळी आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्रभावीपणे आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत दुकानातील पंखे, कुलर, इलेक्ट्रिक मोटारीसह विविध इलेक्ट्रिकल साहित्य जळून खाक झाले असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन विभागाला सकाळी ८.५० वाजता प्राची तायडे यांनी दूरध्वनीद्वारे दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन मुख्यालयातून अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आला. जवानांनी त्वरित पाण्याचा मारा सुरू करून काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. संबंधित इमारत दोन मजली असून तळमजल्यावर दिनेश इलेक्ट्रिकल्स हे दुकान आहे, तर वरच्या मजल्यावर रहिवासी वास्तव्यास आहेत. आग अधिक भडकण्यापूर्वीच नियंत्रणात आल्यामुळे रहिवाशांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण झाला नाही आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

दुकानाचे मालक दिनेश भगवान परदेशी असून, आगीच्या घटनेत दुकानातील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आग विझविण्याच्या मोहिमेत अग्निशमन विभागाचे वाहन चालक प्रकाश चव्हाण तसेच फायरमन संजय तायडे, नितीन ससाने आणि किरण पाटील यांनी तत्परतेने कार्य करून आग पूर्णपणे विझवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here