रेल्वे कर्मचाऱ्याच्या खुनाने भुसावळ हादरले; पाटील मळ्यात चाकूने वार करून हत्या मोटरसायकलवरून जात असताना डोक्या-खांद्याच्या मध्ये वार; संशयित अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

 

जळगाव समाचार | १० सप्टेंबर २०२६

भुसावळ शहरातील पाटील मळा परिसरात गुरुवारी रात्री रेल्वे कर्मचाऱ्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली. रिंग रोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरजवळ मोटारसायकलवरून जात असताना तुषार गोविंदा सोनवणे (वय ३५, रा. श्रावस्ती नगर, भुसावळ) यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. डोक्याच्या व खांद्याच्या दरम्यान गंभीर वार झाल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले.

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत एका १७ वर्षीय अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, तुषार सोनवणे यांचे संशयिताच्या आईसोबत सातत्याने बोलणे अल्पवयीन मुलाला खटकत होते. त्यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात असून, याच वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले, प्रशिक्षणार्थी डीवायएसपी दरेकर, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे व नमुने संकलित केले. तुषार सोनवणे यांच्या हत्येमागील नेमके कारण, हल्ल्याची संपूर्ण पार्श्वभूमी आणि घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा बाजारपेठ पोलिसांकडून तपास सुरू आहे. संशयिताची चौकशी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील अधिक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here