जळगाव समाचार | १७ नोव्हेंबर २०२६
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील राजकारण ढवळून काढले आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेत सोमवारी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. जळगाव तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी माघार घेतल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधातील लढतीचे चित्र बदलले आहे. मात्र, भाजपच्या माजी महापौर जयश्री महाजन आणि माजी जिल्हा परिषद सभापती प्रभाकर सोनवणे यांचे अर्ज कायम असल्याने पालकमंत्र्यांची बिनविरोध निवड अद्याप अनिश्चित आहे. दुसरीकडे अमळनेर मतदारसंघातून भाजपचे प्रफुल्ल हिरालाल पवार यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
कुलभूषण पाटलांच्या माघारीने चर्चेला उधाण
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यंदा प्रथमच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जळगाव तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधात सुरुवातीला माजी महापौर जयश्री महाजन, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील आणि प्रभाकर सोनवणे यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. सोमवारी कुलभूषण पाटील यांनी माघार घेतली. मात्र, आपण जिल्हा बँकेच्या इतर मागासवर्गीय मतदारसंघातूनही अर्ज दाखल केला असल्याने दोन ठिकाणी निवडणूक लढविणे शक्य नसल्यामुळे जळगाव तालुक्यातील अर्ज मागे घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामागे कोणताही राजकीय दबाव नसल्याचेही त्यांनी सांगितले. तरीही ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने पालकमंत्र्यांविरोधातून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सुप्रिया सुळेंचा महाजनांना फोन; मविआला एका जागेचे संकेत
महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. महाविकास आघाडीला जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व मिळावे, यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती स्वतः महाजन यांनी दिली. त्यानंतर महाविकास आघाडीला एक जागा सोडण्याबाबत महायुतीकडून सकारात्मक संकेत मिळाले आहेत. सोसायटी मतदारसंघ वगळता अन्य सहा जागांपैकी एका जागेवर महाविकास आघाडीला संधी मिळू शकते, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचित केले. एका जागेच्या बदल्यात महायुतीविरोधातील इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची तयारी असल्याचीही चर्चा आहे. मात्र, कोणत्या मतदारसंघातून ही जागा दिली जाणार, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
मुक्ताईनगर, बोदवड, चोपड्यात महायुतीचा तिढा कायम
महाविकास आघाडीला जागा देण्याबाबत चर्चा सुरू असली, तरी महायुतीतील अंतर्गत जागावाटपाचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. मुक्ताईनगर, बोदवड आणि चोपडा या मतदारसंघांतील जागांवरून घटक पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचे चित्र आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अजिंठा विश्रामगृहात मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजी मंत्री अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यात सोमवारी दुपारी चार वाजल्यापासून बैठक सुरू होती. मुक्ताईनगर आणि बोदवड या दोन्ही जागांवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी दावा केल्याने चर्चेत एकमत होऊ शकले नाही. अखेर सायंकाळी सातच्या सुमारास ते बैठक सोडून निघून गेले. मंत्री गिरीश महाजन यांनीही जागावाटपातील अडचणी मान्य करत मंगळवारपर्यंत तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली.
जयश्री पाटील बिनविरोध; अन्य मतदारसंघांतही माघारीचे सत्र
अमळनेर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदारसंघातून भाजपचे प्रफुल्ल हिरालाल पवार यांनी अर्ज मागे घेतल्याने जयश्री पाटील यांच्या विरोधातील एकमेव अर्जही संपुष्टात आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. याशिवाय रावेर विकास सोसायटी मतदारसंघातून आमदार नंदकिशोर महाजन यांनी माघार घेतली. इतर सहकारी संस्था मतदारसंघातून गोपाळ भंगाळे, मनोज उत्तमराव महाजन, सुनील शिवदे आणि अमृता मनोज महाजन यांनी, तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून प्रशांत निकम आणि नरेंद्र बळीराम सोनवणे यांनी उमेदवारी मागे घेतली. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, सुमारे ६० टक्के जागा बिनविरोध होतील, असा अंदाज मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
आज माघारीचा अखेरचा दिवस; बिनविरोध निवडी की प्रत्यक्ष लढती?
मंगळवार, दि. १७ हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय हालचालींना निर्णायक वळण मिळणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधातील जयश्री महाजन आणि प्रभाकर सोनवणे माघार घेणार का, महायुतीतील मुक्ताईनगर, बोदवड आणि चोपड्याचा तिढा कसा सुटणार, तसेच महाविकास आघाडीला कोणत्या मतदारसंघातून प्रतिनिधित्व मिळणार, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. एकीकडे बिनविरोध निवडीसाठी नेत्यांची धावपळ सुरू असताना दुसरीकडे मित्रपक्षांतील दावेदारीमुळे महायुतीची कोंडी झाली आहे. त्यामुळे आज माघारीच्या अंतिम मुदतीनंतरच जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे खरे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

![]()







