जळगाव समाचार | २० एप्रिल २०२६
राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २० एप्रिल २०२६ रोजी व्यापक बदल्या जाहीर केल्या असून, या निर्णयाचा थेट परिणाम जळगाव जिल्ह्यावरही झाला आहे. जळगावचे विद्यमान पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पदोन्नतीसह पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) मध्ये बदली करण्यात आली आहे, तर धुळे येथील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार राबविण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यासाठी हा बदल विशेष मानला जात असून, महेश्वर रेड्डी यांनी गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ जिल्ह्यात अत्यंत कार्यक्षम, पारदर्शक व जनतेशी संवाद साधणारे प्रशासन दिले. त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम झाली होती, तसेच गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या उपाययोजनांची व्यापक दखल घेण्यात आली होती.
दरम्यान, राज्यातील इतर महत्त्वाच्या बदल्यांमध्ये सातारा येथील पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची सांगली येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी पुणे येथील पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे यांची सातारा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उप आयुक्त (सुरक्षा) म्हणून नेमण्यात आले आहे.
तसेच, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांना तात्पुरत्या स्वरूपात गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची बदली कोल्हापूर येथे करण्यात आली असून, गडचिरोली येथील अपर पोलीस अधीक्षक एम. सेरा यांना पदोन्नती देत पोलीस अधीक्षक, गडचिरोली म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय, पुणे येथील पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांना वाशिम येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली देण्यात आली आहे.
या सर्व बदल्यांमुळे राज्यातील पोलीस यंत्रणेत व्यापक फेररचना झाली असून, कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने शासनाने हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले आहे. नवीन नियुक्त अधिकाऱ्यांकडून संबंधित जिल्ह्यांमध्ये प्रभावी प्रशासनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

![]()




