जळगाव समाचार | १० जुलै २०२६
कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या कामासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्याने महाराष्ट्राचा अपमान कसा होतो, असा थेट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केला. रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुरुवारी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणावर तसेच राज्यातील विविध विकासकामांच्या नियोजनावर टीकास्त्र सोडले. कनेक्टिंग लिंक प्रकल्पासंदर्भातील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी वापरलेल्या “बघून घेईन” या शब्दप्रयोगावरही त्यांनी आक्षेप घेतला.
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्व आमदार मराठी भाषिक असताना मुख्यमंत्री हिंदीत का बोलतात, हा प्रश्न उपस्थित होतो. कदाचित आपल्या पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाला संदेश द्यायचा असेल म्हणून हिंदीचा वापर केला गेला असावा, असा टोला त्यांनी लगावला. सत्तेत असताना विरोधकांवर राजकीय भूमिका घेणाऱ्यांनी भविष्यात स्वतः विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आल्यास त्याच प्रकारचे राजकारण करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येचा उल्लेख करताना राज ठाकरे यांनी रेडिओ जॉकी मलिष्काच्या “मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाही का?” या गाण्याची आठवण करून दिली. अनेक वर्षे उलटूनही शहरातील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा निवडणुकीत झालेला पराभव उदाहरणादाखल देत, युद्धकाळात सक्षम ठरलेला नेता शांततेच्या काळातही तितकाच योग्य असेलच असे नसते, असे सांगून सुज्ञ समाजच देशाच्या प्रगतीला दिशा देतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
रेल्वे प्रशासनात मराठी कर्मचाऱ्यांचा ठसा कायम राहिला पाहिजे आणि त्यांचे हक्क अबाधित राहण्यासाठी रेल्वे संघटनेतील मनसैनिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले. अठरा वर्षांपूर्वी मनसेने रेल्वेतील मराठी तरुणांच्या हक्कांसाठी केलेले आंदोलन विसरता कामा नये, असे सांगत रेल्वेतील मराठी कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच केवळ रस्ते, पूल किंवा उड्डाणपूल उभारणे म्हणजे विकास नसून शहरांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई, ठाणे आणि पुणे यांसारख्या शहरांचे अनियोजित विद्रूपीकरण सुरू असून, ही स्थिती भविष्यात अधिक गंभीर होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

![]()





