जळगाव समाचार | ९ जुलै २०२६
जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत वाढलेल्या घरफोडीच्या घटनांचा यशस्वी छडा लावत पोलिसांनी पाच अट्टल आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. या कारवाईत घरफोडीतील चोरीचा मुद्देमाल आणि चार दुचाकींसह एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी स्वतंत्र पथके तयार करून गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची मोहीम राबविली.
जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. ६७/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (४)) च्या तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणातून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून गुरुजीत सिंग सुजानसिंग बावरी (वय २६, शिरसोली नाका, तांबापुरा), दीपक बापू पाटील (वय २३, पंचशील नगर, तांबापुरा), राजेश माणिक राठोड (वय २४, तांबापुरा), सुमित संजय कोळी (वय १९, रामेश्वर कॉलनी) आणि महेश उर्फ संतोष भोई (वय २४, तांबापुरा) या पाच आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नऊ घरफोडी आणि एका वाहनचोरीसह एकूण १० गुन्ह्यांची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून घरफोडीतील २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच २ लाख रुपयांच्या चार मोटारसायकली असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तपासात मुख्य आरोपी गुरुजीतसिंग बावरी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात ११, जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात १ आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यात १ असे एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करून एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा घरफोड्यांचे सत्र सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक यज्ञजीता येडले, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार अविनाश देवरे, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, श्रीकांत बदर, पोलीस नाईक कैलास इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, शरद पाटील, दिपक देवरे तसेच वाहनचालक पोलीस हवालदार अशोक पाटील आणि पंकज देशमुख यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

![]()





