जळगाव समाचार | १० जुलै २०२६
लोणावळा–कर्जत घाट विभागात ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन रेल्वे मार्गांचे मोठे नुकसान झाल्याने मुंबई–पुणे दरम्यानच्या दोन महत्त्वाच्या रेल्वे मार्गिका अद्यापही बंद आहेत. तब्बल १०० तासांहून अधिक काळ उलटूनही वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होऊ न शकल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. देखभाल व पुनर्बांधणीच्या कामांना अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मध्य रेल्वेने १० ते १७ जुलैदरम्यान २२ नियमित आणि ८ विशेष अशा एकूण ३० रेल्वेगाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या काळात अल्प सूचनेवर गाड्या रद्द कराव्या लागत असल्याने प्रवाशांचे नियोजन विस्कळीत होत होते. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आणि प्रवासाचे नियोजन सुलभ व्हावे या उद्देशाने आगाऊ निर्णय घेण्यात आला आहे. घाट विभागातील तिन्ही मार्गिका पूर्ववत करण्यासाठी रेल्वेचे अभियंते, तांत्रिक कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून चोवीस तास पुनर्बांधणीची कामे करत असून प्रतिकूल हवामानातही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
रद्द करण्यात आलेल्या महत्त्वाच्या गाड्यांमध्ये हुबळी–दादर एक्स्प्रेस, दादर–हुबळी एक्स्प्रेस, इंदूर–दौंड एक्स्प्रेस, दौंड–इंदूर एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–हैदराबाद एक्स्प्रेस, हैदराबाद–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई–पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–चेन्नई सुपरफास्ट मेल, चेन्नई–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट मेल, महालक्ष्मी एक्स्प्रेस, जोधपूर–हडपसर व हडपसर–जोधपूर एक्स्प्रेस तसेच निवडक दिवशी धावणाऱ्या दादर–सातारा, सातारा–दादर, दादर–साईनगर शिर्डी आणि साईनगर शिर्डी–दादर एक्स्प्रेसचा समावेश आहे. याशिवाय गोरखपूर, गाझीपूर सिटी आणि हजरत निजामुद्दीन मार्गावरील आठ विशेष गाड्याही विविध तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भूस्खलनग्रस्त घाट विभागाची पाहणी करून पुनर्बांधणीच्या कामांचा आढावा घेतला. मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गासह परिसराचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची पथके समन्वयाने काम करत असून घाट विभागातील तीनपैकी एक मध्यम मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र स्लिप लाईन उपलब्ध नसल्याने बँकर इंजिनचा वापर शक्य नसल्यामुळे सर्व गाड्या दोन लोकोमोटिव्ह जोडून चालविण्यात येत आहेत. काही ठिकाणी पुनर्बांधणीसाठी आवश्यक साहित्य पोहोचविणे आव्हानात्मक ठरत असले तरी जिल्हा प्रशासन आणि वन विभागाच्या सहकार्याने काम वेगाने सुरू असून उर्वरित मार्गिकाही शक्य तितक्या लवकर सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

![]()





