बच्चू कडू यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश; विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

 

जळगाव समाचार | ३० एप्रिल २०२६

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून प्रहार संघटनेचे प्रमुख Bacchu Kadu यांनी आज Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मंत्री Uday Samant यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

या प्रवेशावेळी शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक असताना शिंदे गटाकडे ५७ आमदारांचे संख्याबळ असल्यामुळे त्यांच्या दोन उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्या दोन उमेदवारांमध्ये बच्चू कडू यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना सर्वसामान्यांचा, दिव्यांगांचा आणि शोषित घटकांचा लढवय्या नेता असल्याचे सांगितले. गरीब, शेतमजूर, दलित आणि वंचितांसाठी सातत्याने आंदोलन करणारा कार्यकर्ता आज शिवसेनेत दाखल झाल्याने पक्ष अधिक बळकट होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवसेना आणि बच्चू कडू यांचे नाते नवीन नसून ते मूळचे शिवसैनिक असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

प्रहार सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गेली २५ वर्षे काम केल्यानंतर बच्चू कडू यांनी सत्तेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय देता यावा या उद्देशाने शिवसेनेत प्रवेश केल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या ध्येय-धोरणांना सत्तेचे बळ मिळाल्यास समाजहिताचे कार्य अधिक गतीने होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

एकनाथ शिंदे यांनी यावेळी बच्चू कडू यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही देत दिलेला शब्द पाळण्यावर आपला भर असल्याचे सांगितले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर चालत अन्यायाविरोधात लढण्याची परंपरा पुढे नेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. बच्चू कडू यांच्या प्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here