अनुभूती निवासी स्कूलचा १९ वर्षे सलग १०० टक्के निकाल कायम १० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम…

 

जळगाव समाचार | ३० एप्रिल २०२६

जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा कायम ठेवत आयसीएसई (इयत्ता दहावी) आणि आयएससी (इयत्ता बारावी) परीक्षेत शंभर टक्के निकालाची सलग १९ वर्षांची कामगिरी नोंदवली आहे. ३० एप्रिल रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार दहावीमध्ये पलक सुराणा हिने ९६.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर बारावीमध्ये अलेफिया शाकीर कुझेमा हिने ९२.७५ टक्के गुणांसह अव्वल स्थान मिळवले. २००७ साली संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी स्थापन केलेल्या या शाळेने सुरुवातीपासूनच गुणवत्तेचा उच्च दर्जा जपला आहे.

दहावीच्या आयसीएसई परीक्षेस एकूण ३२ विद्यार्थी बसले होते. यामध्ये स्वयंम पाडे याने ९५.६० टक्के गुणांसह द्वितीय, तर स्तुती गर्ग हिने ९४.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ८ विद्यार्थी असून ८० ते ९० टक्क्यांदरम्यान १५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. खानदेशात सीआयसीएसई अभ्यासक्रम राबवणारी पहिली शाळा म्हणून अनुभूतीने स्वतंत्र ओळख निर्माण केली असून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्यभाव, उद्योजकता आणि कौशल्यविकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात.

बारावीच्या आयएससी परीक्षेत एकूण १७ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात ट्विंकल प्रकाश ललवाणी हिने ९१.७५ टक्के गुणांसह द्वितीय, तर आर्यमान बोथरा याने ८९.७५ टक्के गुणांसह तृतीय स्थान मिळवले. इंग्रजी, अकौंट्स, कॉमर्स, इकॉनॉमिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स या विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. अनुभवाधारित शिक्षण, स्पर्धात्मक उपक्रम आणि सृजनशीलतेला वाव देणाऱ्या वातावरणामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले असल्याचे शाळा प्रशासनाने नमूद केले.

या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन तसेच प्राचार्य देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, अनुभूती निवासी स्कूलने स्थापनेपासूनच शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा समतोल राखत उत्कृष्टतेचा ध्यास घेतला आहे. विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या मेहनतीचे, आत्मविश्वासाचे आणि सृजनशीलतेचे प्रतीक असून शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांच्या सहकार्यामुळेच ही परंपरा अधिक भक्कम झाली आहे. अनुभूतीतील विद्यार्थी भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यास सक्षम असून त्यांच्या कामगिरीमुळे संपूर्ण खानदेशाचा अभिमान वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here