जळगाव समाचार | १९ जुलै २०२६
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा दर्शविण्यासाठी जळगावात सोमवारी (दि. 20) शांततापूर्ण निदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. जळगावकर जागृत नागरिकांच्या वतीने दुपारी 12 वाजता शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून मिळत असलेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील नागरिकही एकत्र येऊन आपला नैतिक पाठिंबा नोंदविणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांबाबत केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, पर्यावरण संरक्षणासाठी प्रभावी व संवेदनशील निर्णय घ्यावेत तसेच लोकशाही मार्गाने व्यक्त होणाऱ्या जनभावनांचा आदर राखावा, या प्रमुख मागण्या या निदर्शनातून मांडल्या जाणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
शांततापूर्ण आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईबाबतही या निदर्शनातून चिंता व्यक्त करण्यात येणार असून, लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने आपले मत मांडण्याचा घटनात्मक अधिकार अबाधित राहावा, अशी भूमिका यावेळी मांडली जाणार आहे. तसेच लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची गरजही अधोरेखित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निदर्शनात जळगाव शहर व जिल्ह्यातील विद्यार्थी, तरुण-तरुणी, शिक्षक, पालक, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्व जागरूक नागरिकांनी कोणताही पक्षीय भेद बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांचे जतन हा संपूर्ण समाजाशी निगडित विषय असल्याने प्रत्येक सजग नागरिकाने शांततापूर्ण पद्धतीने आपला सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले असून, या आंदोलनाकडे शहरासह विविध सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे.

![]()





