‘२० जुलै स्वातंत्र्यासाठी दुसरे आंदोलन’; ‘भयमुक्त, अन्यायमुक्त भारतासाठी’ वांगचुकांचे आवाहन

 

जळगाव समाचार | १९ जुलै २०२६

 

पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना १८ जुलै रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर २० जुलै रोजी प्रस्तावित संसदेवरील मोर्चा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाही वांगचुक यांनी आपल्या पत्नीमार्फत संदेश पाठवून हा मोर्चा नियोजित वेळेनुसार काढण्याचे आवाहन केले आहे. या संदेशाची माहिती सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वांगचुक यांनी हस्तलिखित संदेशात, “२० जुलै, स्वातंत्र्यासाठी दुसरे आंदोलन, भयमुक्त भारत आणि अन्यायमुक्त भारत” असे लिहित, पेपर लीकसारख्या अन्यायापासून तसेच आपल्या कथित बेकायदेशीर अटकेच्या भीतीपासून देशाला मुक्त करण्यासाठी हे आंदोलन असल्याचे म्हटले आहे. “भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ” असे संबोधत त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन संसदेवरील मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, सफदरजंग रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या वैद्यकीय माहितीनुसार, प्रदीर्घ उपोषणामुळे सोनम वांगचुक यांच्या शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) निर्माण झाल्याची लक्षणे दिसत असून तातडीच्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. उपचारांसाठी कुटुंबीयांनी अद्याप संमती दिलेली नसल्याचेही रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) एका डॉक्टरचा उपचार पथकात समावेश करण्यात आला असून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

मात्र, वांगचुक यांच्या पत्नीने सफदरजंग रुग्णालयातील उपचारांबाबत गंभीर शंका उपस्थित केली आहे. रुग्णालयाने पोटॅशियमची पातळी २.९ पर्यंत घसरल्याचे सांगितले, परंतु सार्वजनिक आरोग्य बुलेटिनमध्ये हा आकडा नमूद न करता केवळ “पातळी कमी होत आहे” असा उल्लेख केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. स्वतंत्र प्रयोगशाळेच्या तपासणीत पोटॅशियमची पातळी ३.५ असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करत त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याची मागणी केली आहे.

या घडामोडींमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये केंद्र सरकारच्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, उपोषणकर्त्याला आंदोलनस्थळावरून बळजबरीने हटवून रुग्णालयात दाखल करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे, वांगचुक यांच्या आवाहनानंतर २० जुलै रोजी प्रस्तावित संसदेवरील मोर्चाकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here