जळगावात तळीरामांची खैर नाही; सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या १०७ जणांना पोलिसांचा दणका…

 

जळगाव समाचार | १९ जुलै २०२६

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांनी कठोर भूमिका घेत विशेष मोहीम राबवत जिल्हाभरात १०७ जणांवर कायदेशीर कारवाई केली. १७ जुलै रोजी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत शहरासह जिल्ह्यातील विविध संवेदनशील ठिकाणी विशेष तपासणी करून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

या कारवाईत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ११२/११७ अंतर्गत १०५ जणांवर, तर कलम ८५ (१) अंतर्गत दोन जणांवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपानामुळे वाद, गोंधळ तसेच शांतता भंगाच्या घटना घडू नयेत, यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रतिबंधात्मक कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान टाळून कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी म्हटले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भविष्यातही अशाच कठोर मोहिमा राबविण्यात येणार असल्याचा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here