कर्तव्यापुढे सोन्याचंही मोल कमी; बीव्हीजी कर्मचाऱ्यांनी जपला प्रामाणिकपणाचा आदर्श घंटागाडीतील कचरा पिंजून शोधून परत केले सात ग्रॅम सोन्याचे दागिने

 

जळगाव समाचार | २१ जुलै २०२६

जळगाव शहरात बीव्हीजी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावाचे उल्लेखनीय उदाहरण घालून दिले आहे. घरगुती कचऱ्यासोबत चुकून गेलेले सुमारे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून शोधून संबंधित मालकाला सुखरूप परत करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना जळगाव शहरातील वार्ड क्रमांक १९ मधील रामेश्वर कॉलनी परिसरात घडली.

बीव्हीजी कंपनीचे चालक अविनाश रवींद्र चौधरी आणि हेल्पर सुरेश संजय जाधव हे नेहमीप्रमाणे रामेश्वर कॉलनी परिसरात घरगुती कचरा संकलनाचे काम करत होते. त्यावेळी रहिवासी शिवाजी बाबुराव वंजारी यांच्या घरातील सुमारे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने नजरचुकीने कचऱ्यासोबत संकलन वाहनात गेले. संपूर्ण वार्डातील कचरा संकलित झाल्यानंतर आणि वाहन कॉम्पॅक्टरमध्ये रिकामे करण्यासाठी जात असतानाच वंजारी यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.

घटनेचे गांभीर्य ओळखून अविनाश चौधरी व सुरेश जाधव यांनी कोणताही विलंब न करता वाहन नेरे नाका येथील बीव्हीजीच्या झोनमध्ये नेले. तेथे संपूर्ण कचरा खाली करून प्रत्येक कॅरीबॅग काळजीपूर्वक तपासण्यात आली. बराच वेळ अथक शोध घेतल्यानंतर अखेर कचऱ्यातून सोन्याचे कानातील दागिने सुरक्षितपणे मिळाले. त्यानंतर या घटनेची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक कुणाल बारसे, सुपरवायझर नीरज पाटील आणि व्यवस्थापक विनोद रेड्डी यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दागिने टीबीएस हॉस्पिटल परिसरातील बीव्हीजीच्या मुख्य कार्यालयात आणून आवश्यक खातरजमा केल्यानंतर संबंधित मालक शिवाजी बाबुराव वंजारी यांच्याकडे प्रामाणिकपणे सुपूर्द करण्यात आले.

हरवलेले मौल्यवान दागिने सुखरूप परत मिळाल्याने शिवाजी वंजारी यांनी चालक अविनाश चौधरी आणि हेल्पर सुरेश जाधव यांचे मनापासून आभार मानले. व्यवस्थापक विनोद रेड्डी यांच्या उपस्थितीत दोन्ही कर्मचाऱ्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. त्यांना भेटवस्तू व आर्थिक प्रोत्साहन देऊन त्यांच्या प्रामाणिकपणाचा गौरव करण्यात आला. या घटनेमुळे बीव्हीजीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि सामाजिक जबाबदारीची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून, “प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here