तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा; विरोधक आक्रमक… विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ राहुल गांधींचे आंदोलन

 

जळगाव समाचार | २१ जुलै २०२६

दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थान ‘७, लोककल्याण मार्ग’ बाहेर अचानक ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा तसेच काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्याने राजधानीत राजकीय वातावरण चांगलेच तापले.

पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचल्यानंतर राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईबाबत निषेध नोंदवत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. पंतप्रधानांचे निवासस्थान अतिसंवेदनशील सुरक्षा क्षेत्र असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना तेथून हटण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलन सुरूच राहिल्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले.

आंदोलनापूर्वी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट देऊन पोलीस कारवाईत जखमी झालेल्या विद्यार्थी व कार्यकर्त्यांची विचारपूस केली. या भेटीनंतर त्यांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन सुरू केले. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत, “तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष कारवाईचे उत्तर मागण्यासाठी आम्ही पंतप्रधानांच्या घरापर्यंत आलो आहोत. देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा,” अशी मागणी केली.

दरम्यान, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी काढण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हा वाद अधिक तीव्र झाला आहे. विद्यार्थ्यांवरील बळप्रयोगाच्या निषेधार्थ विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, या प्रकरणामुळे केंद्र सरकार आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here