जळगाव समाचार | ११ जुलै २०२६
जळगाव शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याने संयुक्तरित्या मोठी कारवाई करत ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. या कारवाईत २ लाख ८१ हजार ५४० रुपये किमतीचा अंमली पदार्थ, २५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर (एमएच-१९-डीजे-०१३२) मोटारसायकल असा एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरी ओम नगर, मोहन टॉकीजजवळ, जळगाव) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचन नगर, जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (१० जुलै) पहाटे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारी असलेल्या जी.एस. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आली.
जिल्ह्यात “नशामुक्त भारत” अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन रोखण्यासाठी गोपनीय माहितीच्या आधारे कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे घटनास्थळी सापळा रचला. मोटारसायकलवरून आलेल्या तिघा संशयितांना अडविण्याचा प्रयत्न केला असता एक जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला, तर उर्वरित दोघांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्याकडून मेफेड्रोन जप्त करण्यात आले. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने प्राथमिक तपासणी करून जप्त पदार्थ मेफेड्रोन असल्याची खात्री केली.
प्राथमिक चौकशीत अटक आरोपींनी फरार आरोपी भैय्या सोनवणे (रा. कांचन नगर, जळगाव) याच्याकडून विक्रीसाठी मेफेड्रोन घेतल्याची कबुली दिल्याने त्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून कसून शोध सुरू आहे. दरम्यान, अटक आरोपी जयेश देविदास तायडे याच्याविरुद्ध यापूर्वी रामानंद पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा व गंभीर दुखापतीचा, तसेच जळगाव शहर पोलीस ठाण्यात दरोड्याचा असे चार गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२१७/२०२६ अन्वये एनडीपीएस अधिनियम १९८५ मधील कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात सपोनि अनिल वाघ, पोउनि संतोष पवार, पोउनि दीपक जगदाळे, पोउनि जितेंद्र वल्टे, सफौ. अतुल वंजारी, सफौ. हेमराज भावसार, पोहेकॉ. अकरम शेख, पोहेकॉ. मुरलीधर धनगर, पोहेकॉ. प्रविण भालेराव, पोहेकॉ. महेश महाजन, पोहेकॉ. विजय पाटील, पोहेकॉ. किशोर पाटील, पोहेकॉ. छगन तायडे, पोकों. प्रदीप सपकाळे, पोकों. राहुल रगडे आणि पोकों. उदय कापडणे यांच्या पथकाने केली. अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतुकीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

![]()





