प्रेमविवाहाला विरोध एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन गट भिडले

 

जळगाव समाचार | ११ जुलै २०२६

 

प्रेमविवाह करून कायदेशीर संरक्षणासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सज्ञान तरुण-तरुणीच्या प्रकरणाला शुक्रवारी रात्री नाट्यमय वळण लागले. दोघेही पोलीस ठाण्यात आल्याची माहिती मिळताच त्यांच्या दोन्ही कुटुंबीयांसह नातेवाईक आणि समर्थक मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. सुरुवातीला तरुण-तरुणीच्या निर्णयावरून दोन्ही बाजूंमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला. पोलिसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र काही वेळातच संताप अनावर झाल्याने दोन्ही गटांतील व्यक्ती एकमेकांवर धावून गेल्या. धक्काबुक्की, मारहाण आणि गोंधळामुळे पोलीस ठाणे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. या गोंधळात पोलीस ठाण्यातील खिडक्यांच्या काचा फुटून शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील तरुण आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या तरुणीमध्ये काही काळापासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांचा विरोध असल्याने दोघांनी घर सोडून परस्पर संमतीने विवाह केला. भविष्यात कोणताही कायदेशीर वाद उद्भवू नये तसेच संरक्षण मिळावे, या उद्देशाने त्यांनी शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. दरम्यान, या प्रकरणात एका विद्यमान नगरसेवकाशी संबंधित गट आणि एका माजी जिल्हा परिषद सदस्याशी संबंधित गट आमनेसामने आल्याने तणाव अधिकच वाढल्याची माहिती समोर आली. दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी, बाचाबाची आणि हाणामारी झाल्याने काही काळ पोलीस ठाणे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाला. पोलिसांनी दोन्ही गटांना वेगळे करून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रेमविवाह केलेले तरुण आणि तरुणी हे दोघेही सज्ञान असून त्यांनी स्वतःच्या इच्छेने विवाह केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक कायदेशीर संरक्षण देण्यात आले असून दोन्ही कुटुंबीयांची समजूत काढण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. गोंधळादरम्यान झालेल्या तोडफोडीमुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याने पोलीस ठाणे परिसरातील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेण्यात आले आहे. मारहाण, गोंधळ आणि तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here