राज्य महिला आयोगावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती होणार ? – सूत्र…

 

जळगाव समाचार | ५ मे २०२६

राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद अद्याप रिक्त असल्याने या पदावर नियुक्ती कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी नुकताच या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आयोगाचे कामकाज नेतृत्वाविना सुरू आहे.

दरम्यान, या महत्त्वाच्या पदासाठी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कर्तव्यदक्ष आणि कठोर निर्णयक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेल्या बोरवणकर यांनी यापूर्वी पुणे शहराच्या पोलिस आयुक्तपदासह मुंबई क्राईम ब्रँचचे नेतृत्वही यशस्वीपणे सांभाळले आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीबाबत सकारात्मक संकेत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

रुपाली चाकणकर यांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद दीर्घकाळ रिक्त राहिले असून, राज्यात वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सक्षम नेतृत्वाची गरज व्यक्त केली जात आहे.

याच दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महिला आयोगाच्या प्रमुखपदी अनुभवी माजी आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता मीरा बोरवणकर यांच्या नावाची चर्चा अधिक गती घेत आहे. तथापि, राज्य सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत निर्णय किंवा घोषणा करण्यात आलेली नाही.

विशेष म्हणजे, मीरा बोरवणकर यांनी अलीकडेच ‘मॅडम कमिशनर’ हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित केले असून, त्यामध्ये त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या काही उल्लेखांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाव्य नियुक्तीकडे अधिकच उत्सुकतेने पाहिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here