मंत्री गिरीश महाजनांचा सुरत पोलिसांना फोन आणि जळगावच्या कुटुंबाच्या खुनाचे धक्कादायक कारण समोर…

 

जळगाव समाचार | २५ नोव्हेंबर २०२६

पोटाची खळगी भरण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून गुजरातला निघालेल्या एका कष्टकरी कुटुंबाचा क्रूर पद्धतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात चार हल्लेखोरांनी या कुटुंबाची गाडी अडवून सर्वांना भरधाव कालव्यात ढकलून दिले. या थरारक घटनेत एरंडोल परिसरातील नितीन ऊर्फ भुरिया पाटील, त्यांची पत्नी कविता पाटील आणि एका तरुणीसह पाच जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, कुटुंबातील १३ वर्षीय मुलाने कालव्याला लागून असलेला पाईप घट्ट पकडल्याने तो या मृत्युच्या दाढेतून सुखरूप बचावला आणि त्यानेच बाहेर येऊन या निर्घृण हत्याकांडाचा उलगडा केला.
एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कारखान्यात मजुरी करणारे नितीन पाटील हे २१ नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबासह रोजगारासाठी सुरतकडे निघाले होते. बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळील कालव्याच्या परिसरात दुसऱ्या कारमधून आलेल्या खंडियो, अभो, बंटी आणि एका अनोळखी व्यक्तीने त्यांची गाडी अडवली. आरोपींनी सर्वांना जबरदस्तीने गाडीबाहेर ओढून कालव्याच्या वेगवान प्रवाहात ढकलून दिले आणि तिथून पोबारा केला. पाण्यात वाहून जात असताना १३ वर्षीय मुलाने प्रसंगावधान राखत पाईपचा आधार घेतला व कसाबसा जीव वाचवला. त्याने जवळच्या हॉटेलमध्ये धाव घेत घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाने शोधमोहीम राबवली असता, महुवा तालुक्यातील डुंगरी परिसरात पाच जणांचे मृतदेह हाती लागले.
या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले असून, हा केवळ अपघात किंवा किरकोळ वाद नसून एका मोठ्या कटकारस्थानाचा भाग असल्याचा संशय बळावला आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सुरत पोलिसांशी संपर्क साधून या घटनेचा तपशील जाणून घेतला. मृत पाटील कुटुंब हे एका विमा घोटाळ्याच्या प्रकरणात महत्त्वाचे साक्षीदार होते आणि ही साक्ष कायमची मिटवण्यासाठीच त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला चढवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज सुरत पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत असून, फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी सुरत ग्रामीण पोलिसांनी आठ स्वतंत्र पथके रवाना केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here