जळगाव समाचार | ५ मे २०२६
राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दिला जाणारा दरमहा १५०० रुपयांचा सन्मान निधी काही महिन्यांपासून रखडला होता. ई-केवायसी प्रक्रियेतील विलंब आणि अलीकडील पोटनिवडणुकांमुळे निधी वितरण थांबले होते. मात्र, आता ई-केवायसीची मुदत ३० एप्रिल २०२६ रोजी पूर्ण झाल्यानंतर सरकारने निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये महिलांच्या खात्यात शेवटचा हप्ता जमा झाला होता. त्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते अद्याप जमा झालेले नाहीत. यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. काही महिलांना जानेवारीपासून निधी न मिळाल्याने त्यांचा अर्ज बाद झाला आहे का, अशी शंका व्यक्त केली जात होती.
राज्य सरकारकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मार्च महिन्यापासूनचे थकीत हप्ते लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, निधी वितरण पुढील काही दिवसांत सुरू होऊ शकते.
दरम्यान, महिलांना एकत्रित किती रक्कम मिळणार याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता झालेली नाही. काही अंदाजानुसार मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये जमा होऊ शकतात, तर मे महिन्याचा हप्ता धरल्यास ४५०० रुपये एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, काही सूत्रांच्या मते प्रारंभी केवळ मार्च महिन्याचाच हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे.
ई-केवायसी प्रक्रियेनंतर अर्जांची पडताळणी करण्यात आली असून, निकष पूर्ण न करणाऱ्या किंवा ई-केवायसी न केलेल्या सुमारे ५४ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. सध्या राज्यातील सुमारे १ कोटी ८९ लाख पात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे शासनाच्या खर्चात अंदाजे १२०० कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

![]()




