जळगावच्या इस्लामपुरा भागात प्रतिबंधित गोमांस विक्रीचा पर्दाफाश; शनिपेठ पोलिसांच्या छाप्यात एकाला अटक…

 

जळगाव समाचार | २५ नोव्हेंबर २०२६

शहरातील इस्लामपुरा परिसरात सुरू असलेल्या प्रतिबंधित गोमांस विक्रीवर शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत एका तरुणाला रंगेहाथ पकडले आहे. मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी मदिना मशिदीजवळ टाकलेल्या या छाप्यात पोलिसांनी ५५ किलो गोमांस आणि विक्रीचे साहित्य असा एकूण १९,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कुरेशी सज्जाद खान युसुफ (वय २४, रा. इस्लामपुरा, जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध गोवंश वाहतूक आणि गोमांस विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना गोपनीय यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश दिले होते. या सूचनांनुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना इस्लामपुरा भागातील मदिना मशिदीजवळ प्रतिबंधित गोमांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा पांढरे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकासह घटनास्थळी धाड टाकली. यावेळी संशयित कुरेशी सज्जाद खान युसुफ हा गोमांस विक्री करताना आढळून आला.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ११ हजार रुपये किमतीचे ५५ किलो गोमांस, एक जुना फ्रिज, दोन वजनकाटे, लोखंडी सुरे, कुऱ्हाड, विविध वजनाची मापे, मोठे अॅल्युमिनियमचे पातेले आणि स्टीलचे हंडे असा एकूण १९,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भागवत विकास करत आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पूजा पांढरे, संतोष खेडेकर यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, शशिकांत पाटील, रविंद्र इंधाटे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी, पराग दुसाने, गजानन वाघ, निलेश घुगे, नवजित चौधरी व सतीश भारुळे यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here