जळगाव समाचार | २० मे २०२६
लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहत असल्याचा दावा करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. रायबरेली येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी जागतिक परिस्थिती, इंधनटंचाई आणि रुपयाच्या घसरणीचा उल्लेख करत आगामी काळ देशासाठी अत्यंत कठीण ठरणार असल्याचे म्हटले.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगताना राहुल गांधी यांनी इराण-अमेरिका संघर्षाचा संदर्भ दिला. इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले असून जगातील मोठ्या प्रमाणातील तेलवाहतूक या मार्गातून होत असल्याने अनेक देशांना इंधन व गॅस तुटवड्याचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका भारतातील शेतकरी, मजूर, बेरोजगार तरुण, लहान व्यापारी आणि सूक्ष्म उद्योगांना बसणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. आगामी आर्थिक मंदी ही मागील अनेक वर्षांतील सर्वात गंभीर ठरू शकते, असे सांगत त्यांनी जनतेने परिस्थितीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. देशातील जनतेला खर्च कमी करण्याचे आणि परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले जात असताना सरकारकडून मात्र वेगळी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आर्थिक प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आगामी काळात इंधनदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने होत असलेली घसरणही चिंतेचा विषय ठरत आहे. १५ मे रोजी डॉलरचा दर ९४.५९ रुपये होता, तो १९ मेपर्यंत ९६.३३ रुपयांवर पोहोचल्याने आर्थिक दबाव वाढत असल्याचे चित्र आहे.
यापूर्वी नेदरलँडमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जागतिक आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. जागतिक अस्थिरतेमुळे मोठ्या प्रमाणावर लोक गरिबीकडे ढकलले जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे जागतिक तणाव, इंधन संकट आणि चलनघसरणीच्या पार्श्वभूमीवर देशातील आर्थिक परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
![]()






