जळगाव समाचार | २२ मे २०२६
बोदवड येथील खूनप्रकरणानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यात हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत बोदवड पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रतिबंधक उपाययोजना वेळेत न केल्यामुळे गंभीर गुन्हा घडल्याचा आरोप संबंधितांवर ठेवण्यात आला असून, निलंबितांमध्ये पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक दीपक सुरवडकर, टाऊन बिट प्रभारी सहाय्यक फौजदार रवींद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी बोदवड पोलीस ठाण्यात रजिस्टर क्रमांक ००९६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे अदखलपात्र गुन्हा क्रमांक ०२८०/२०२६ देखील नोंदविण्यात आला होता. परिसरात वाढत असलेला तणाव आणि दोन्ही गटांतील धुसफूस लक्षात घेता प्रतिबंधक कारवाईची जबाबदारी हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आवश्यक चौकशी किंवा प्रभावी कारवाई करण्यात आलेली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर दोन्ही गटांतील संघर्ष वाढत गेला आणि अखेर खुनासारखी गंभीर घटना घडल्याचे समोर आले.
दरम्यान, बोदवड शहराचे टाऊन बिट प्रभारी म्हणून कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार रवींद्र गुरचळ यांना १९ मे रोजी संबंधित दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल मोहन चौधरी यांना सोबत घेऊन घटनास्थळी भेट दिली होती. दोन्ही गटांतील वाढते वैमनस्य आणि संभाव्य तणावाची माहिती असूनही संबंधितांना पोलिस ठाण्यात आणून कोणतीही प्रतिबंधक अथवा कायदेशीर कारवाई न करता सोडून देण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. या निष्काळजीपणामुळेच २१ मे रोजी गंभीर गुन्हा घडल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात बोदवड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक दीपक सुरवडकर यांच्यावरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. १९ मे रोजी हिदायत नगर परिसरातील वाढत्या वादाची माहिती पोलीस कॉन्स्टेबल मोहन चौधरी यांनी त्यांना दूरध्वनी आणि व्हॉट्सॲपद्वारे दिली होती. तसेच स्थानिक नगरसेवकानेही परिसरातील संवेदनशील परिस्थितीबाबत सतर्क केले होते. मात्र, गंभीर माहिती मिळूनही त्यांनी स्वतः तातडीची कारवाई केली नाही किंवा अधीनस्थ कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या नाहीत. याशिवाय वरिष्ठ कार्यालय तसेच नियंत्रण कक्षालाही वेळेत माहिती न दिल्याचे समोर आले आहे. परिणामी, कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत संबंधित तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, या घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
![]()






