जळगाव उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये कोटींचा मुद्देमाल; एसीबीच्या धाडीने खळबळ

 

जळगाव समाचार | २२ मे २०२६

जळगाव येथील सहकारी संस्था विभागाचे उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी यांच्या बँक लॉकरमध्ये तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५९ रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल आढळून आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक-जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने तसेच रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जगदीश बाबूराव बारी (वय ५६) हे सहकारी संस्था विभाग, जळगाव येथे उपनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेल्या तपासादरम्यान त्यांच्या एका बँकेतील लॉकरची झडती घेण्यात आली. या झडतीत ६६०.३३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगड्या, सोन्याची बिस्किटे व इतर दागिने असा ऐवज सापडला. या सोन्याच्या दागिन्यांची किंमत १ कोटी ११ हजार ९६० रुपये इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच १०.५०० ग्रॅम वजनाची चांदीची दागिने, ज्यांची किंमत २६ हजार २५९ रुपये आहे, तीही जप्त करण्यात आली.

याशिवाय लॉकरमधून ८ लाख ३६ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून, त्यामध्ये प्रामुख्याने ५०० रुपयांच्या नोटांचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. यापूर्वी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईनंतर आरोपी जगदीश बारी यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या धाडीनंतर सहकार विभागात एकच खळबळ उडाली असून, आरोपीकडे आढळलेल्या संपत्तीचा स्रोत, आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेशी संबंधित इतर बाबींचा तपास यंत्रणांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here