जळगाव समाचार | १० जुलै २०२६
इंग्लंडने भारताविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात तब्बल नऊ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी घेत मालिका आपल्या नावावर केली. या विजयासह इंग्लंडने इतिहासात प्रथमच दोनपेक्षा अधिक सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतावर मालिका विजय मिळवण्याचा पराक्रम केला. भारतीय संघाला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे मालिका गमावण्याची नामुष्की ओढवली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. अव्वल फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्याने संघ अडचणीत सापडला. अशा वेळी कर्णधार श्रेयस अय्यर याने ४९ चेंडूत नाबाद ८० धावांची झुंजार खेळी करत डाव सावरला. शिवम दुबे याने २२, अभिषेक शर्मा याने १६, तर वैभव सूर्यवंशी याने १५ धावांचे योगदान दिले. भारताने निर्धारित २० षटकांत ७ बाद १५८ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांनी प्रत्येकी दोन, तर विल जॅक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी एक विकेट घेत भारतीय फलंदाजीवर प्रभावी अंकुश ठेवला.
१५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. सलामीवीर फिल सॉल्ट याने ४२ चेंडूत ५९ धावा, तर कर्णधार हॅरी ब्रुक याने ३५ चेंडूत आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ७९ धावांची तुफानी खेळी केली. या दोघांच्या दमदार भागीदारीमुळे इंग्लंडने अवघ्या १३.५ षटकांत एकच विकेट गमावत लक्ष्य पार केले. भारताकडून अर्शदीप सिंग यालाच एकमेव यश मिळाले.
या पराभवासह भारताला जवळपास १२ वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. २०१४ मध्ये एका सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने विजय मिळवला होता; मात्र दोनपेक्षा अधिक सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतावर विजय मिळवण्याची ही इंग्लंडची पहिलीच वेळ ठरली. तसेच, आयर्लंडनंतर इंग्लंडमध्येही मालिका गमावत भारताने सुमारे सात वर्षांनंतर सलग टी-२० मालिका पराभवाचा अनुभव घेतला. श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे सलग पाच टी-२० सामने पराभवात संपले असून, मालिकेतील एक सामना पावसामुळे रद्द झाला.

![]()





