प्रसूतीनंतर विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; पिंपळनेरमध्ये आंदोलन, चौकशीची मागणी तीव्र

 

जळगाव समाचार | १६ जुलै २०२६

प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या देगाव (ता. साक्री) येथील पूनम सोन्या अहिरे (वय २५) या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मंगळवारी (ता. १४) पिंपळनेर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून संबंधित रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन करत डॉक्टरांविरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पिंपळनेर पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून राज्य राखीव पोलिस दलालाही पाचारण करण्यात आले.

पूनम अहिरे यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर प्रथम देगाव येथून पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे दाखल करून घेण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर त्यांना पिंपळनेर येथील डॉ. तावडे (तायडे) यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूतीनंतर त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. उपचारात निष्काळजीपणा झाल्यामुळेच पूनम अहिरे यांचा मृत्यू झाल्याचा दावा करत संतप्त नागरिकांनी रुग्णालयासमोर आंदोलन छेडले. काही आंदोलकांनी रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

मृत महिलेचे पती सोन्या मोहन अहिरे यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारात टाळाटाळ केल्याचा तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी चुकीचे उपचार करून पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप केला आहे. संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीपूर्वी रक्ताची आवश्यकता असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, रक्ताची व्यवस्था होण्यापूर्वीच प्रसूती करण्यात आली आणि प्रकृती गंभीर झाल्यानंतरही वेळेत वस्तुस्थिती सांगितली गेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांचा संताप अधिक वाढला. दरम्यान, काही अज्ञातांनी रुग्णालयावर दगडफेक केल्याची घटनाही घडली.

या प्रकरणी मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथे पाठविण्यात आला असून, जिल्हा शल्यचिकित्सकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव सहारे यांनी दिली. दरम्यान, संबंधित डॉक्टरांविरोधात यापूर्वीही काही तक्रारी झाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. आदिवासी संघटनांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच संबंधित डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here