जळगाव समाचार | १६ जुलै २०२६
शहरातील आर.आर. विद्यालयातील शैक्षणिक, प्रशासकीय अनियमितता तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने चौकशी व सुधारात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विद्यालयात गेल्या दीड वर्षांपासून नियमित प्राचार्य नसल्याने प्रशासनावर प्रभावी नियंत्रण राहिले नसून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षण, शिस्त आणि सुरक्षिततेवर होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, विद्यालयातील अनेक शिक्षक वेळेवर वर्गावर उपस्थित राहत नसल्याच्या तसेच नियोजित तासिका नियमित घेतल्या जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थिती, शिस्त आणि सुरक्षिततेकडेही अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला असून, शाळेतील एकूणच शैक्षणिक वातावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी विद्यालयातील एका विद्यार्थ्याच्या मृत्यूची गंभीर घटना घडल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती, शाळेतील सुरक्षा व्यवस्था आणि संबंधित जबाबदार व्यक्तींच्या भूमिकेची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये विद्यालयात तातडीने नियमित व पात्र प्राचार्यांची नियुक्ती करणे, शैक्षणिक, प्रशासकीय आणि सुरक्षा व्यवस्थेची स्वतंत्र चौकशी करणे, शिक्षकांच्या उपस्थिती व अध्यापनाची नियमित तपासणी करणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, देखरेख आणि शिस्त नियंत्रण यंत्रणा अधिक प्रभावी करणे तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करणे, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, सुरक्षितता आणि पालकांचा शाळेवरील विश्वास कायम राखण्यासाठी प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी राहुल पाटील, भुषण भोळे, विशाल महाजन, प्रशांत कोळी, राझिक पटेल, ओम बारी, रंजन पाटील, लोकेश चौधरी, ओम चौधरी, प्रेम चौधरी आणि रोहन पवार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

![]()





