सरकारला जनतेच्या आवाजाची किंमत नाही ; राज ठाकरेंचा घणाघाती हल्ला सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन

 

जळगाव समाचार | १६ जुलै २०२६

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या १९ दिवसांपासून बेमुदत उपोषण करत आहेत. दीर्घकाळ सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांचे सुमारे साडेआठ किलो वजन घटले असून प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वांगचुक यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यास सुरुवात केली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही फेसबुक पोस्टद्वारे त्यांना उपोषण थांबविण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये सरकारवर तीव्र टीका करताना, आंदोलनाची जागा आणि लोकशाही मूल्यांचा अवमान होत असल्याची खंत व्यक्त केली. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत येणाऱ्या बातम्या आणि सोशल मीडियावरील दृश्ये चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी सरकारने या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तसेच, भारतीय जनता पक्षाला सोयीचे असेपर्यंतच व्यक्तींविषयी आस्था असते, अशी टीकाही त्यांनी केली.

लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर सुरुवातीला वांगचुक यांनी केंद्र सरकारचे स्वागत केले होते. मात्र, त्यानंतर लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा, दोन लोकसभा मतदारसंघ, तसेच स्थानिकांच्या जमिनीवरील हक्कांचे संरक्षण या मागण्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलने आणि उपोषणे केली, तरीही सरकारने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. निवडणुकीतील यशाच्या जोरावर सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

सामान्य नागरिकांनाही राज ठाकरे यांनी या पोस्टमधून आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे. समाजातील सुजाण नागरिक सोशल मीडियावरील ‘लाईक्स’ आणि ‘शेअर्स’मध्ये अडकून प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेपासून दूर जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नागरिकांनी मोबाईलच्या स्क्रीनच्या बाहेर येऊन सरकारला प्रश्न विचारण्याची सवय लावली पाहिजे, अन्यथा जनतेच्या मतांसह तिचा आवाजही दडपण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांना मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला. सोनम वांगचुक यांच्यासारख्या आंदोलकांवर अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी समाजाने सजग होण्याची गरज असल्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here