धरणगावात नराधम शिक्षकाकडून दोन वर्षांपासून १० वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

 

जळगाव समाचार | १६ मे २०२६

धरणगाव तालुक्यातील एका गावात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाकडून १० वर्षीय मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून कथित लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात नंदलाल नारायण मराठे या शिक्षकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह धरणगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. संशयित आरोपी नंदलाल मराठे हा तिला सकाळच्या वेळेत शाळेत सर्वात आधी १० वाजता झाडू मारण्याच्या कारणाने बोलावून घेत असे. संबंधित ठिकाणी कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपी तिच्यावर कथित अत्याचार करत होता. तसेच मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

मुलीने या प्रकाराला विरोध दर्शविल्यानंतर आरोपीकडून तिला मारहाण करण्यात येत असल्याचेही समोर आले आहे. शिवाय, “हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझे आई-वडील मरून जातील,” अशी धमकी देऊन तिला गप्प राहण्यास भाग पाडले जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, पीडित मुलगी काही दिवसांपूर्वी आपल्या मावशीकडे गेली असता तिची प्रकृती बिघडली. तिने जेवण करणेही बंद केल्याने नातेवाईकांनी तिची विचारपूस केली. त्यावेळी तिने रडत रडत आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान शाळेच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३० एप्रिल २०२६ रोजी आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसांनी आरोपी शिक्षक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत. या घटनेनंतर नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here