जळगाव: नीट-यूजी २०२६ परीक्षेतील अनियमितता, पेपर लीक आणि परीक्षा प्रक्रियेतील गंभीर त्रुटींच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) जळगाव शाखेच्या वतीने शहरातील काव्यरत्नावली चौकात गुरुवारी तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा!
या आंदोलनात ११ वी व १२ वी विज्ञान शाखेचे विद्यार्थी, नीटचे परीक्षार्थी आणि अभाविप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा”, “NTA जवाब दो” आणि “पेपर माफियांवर कठोर कारवाई करा” अशा घोषणांनी काव्यरत्नावली चौक दणाणून गेला होता. २०२४ मध्ये अशाच प्रकारच्या घटना घडल्यानंतरही पुन्हा परीक्षा प्रक्रियेत गोंधळ होणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रमुख मागण्या आणि भूमिका
अभाविपने या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली:
• डॉ. वरुणराज नन्नवरे (प्रदेशमंत्री, अभाविप देवगिरी): “लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करून या परीक्षेची तयारी करतात. पेपर लीकमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे. या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अभाविप प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवेल.”
• वरद पांढारकर (महानगर मंत्री, जळगाव): “वारंवार होणाऱ्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था निर्माण होईपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील.”
उपस्थिती
या आंदोलनात अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, महानगर सहमंत्री वरद पांढारकर, ललित सोनार, गणेश दुसाने, मोहित सोनी यांच्यासह अभाविपचे अनेक पदाधिकारी व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. या निदर्शनांमुळे काही काळ परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

![]()




