जळगाव समाचार | ५ ऑगस्ट २०२६
शहरातील हॉटेल दरबार व सीएनजी गॅस पंप परिसरात बुधवारी सकाळी भरधाव टँकरने दुचाकीला मागून धडक दिल्याने मंगला अर्जुन माळी (वय ५५, रा. ज्ञानदेव नगर) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगा भरत माळी (वय २९) किरकोळ जखमी झाला आहे.
मंगला माळी या मुलगा भरतसोबत पिंप्राळा येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी जात असताना हा अपघात झाला. धडकेनंतर त्या रस्त्यावर पडल्या व टँकरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर चालकाने टँकरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांनी पाठलाग करून आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलसमोर त्याला पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.
मंगला माळी या भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. या घटनेनंतर भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

![]()





