निठारी हत्याकांडातून सुटलेल्या सुरेंद्र कोळीचा हरिद्वारमध्ये चहाच्या टपरीवर गळफास; मृत्यूने खळबळ…

 

जळगाव समाचार | १८ सप्टेंबर २०२६

देशभरात गाजलेल्या निठारी हत्याकांडातील आरोपी आणि नंतर सर्वोच्च न्यायालयातून निर्दोष मुक्त झालेल्या सुरेंद्र कोळी याचा शुक्रवारी (दि. १८ सप्टेंबर) हरिद्वारमध्ये मृतदेह आढळून आला. भूपतवाला परिसरातील सप्त सरोवर रोडवर, लालमाता मंदिरासमोरील चहाच्या टपरीत तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मागील काही महिन्यांपासून कोळी याच परिसरात राहत होता आणि चहाची टपरी चालवत होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

पोलिस अधिकारी शिशुपाल सिंह नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळलेली नाही. प्राथमिक तपासात कोळीने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे दिसून येत असले तरी मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी कोळीच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती दिली आहे.

२००६ मध्ये नोएडा येथील निठारी परिसरात महिला आणि मुलांचे मृतदेह व मानवी अवशेष आढळल्यानंतर हे प्रकरण देशभर चर्चेत आले होते. मोनिंदर सिंह पंढेर यांच्या घरात घरगडी म्हणून काम करणाऱ्या सुरेंद्र कोळीला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्यावर अनेक प्रकरणांत खटले चालले आणि विविध टप्प्यांवर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, पुराव्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०२३ मध्ये त्याची अनेक प्रकरणांतून निर्दोष मुक्तता केली.

यानंतर निठारी हत्याकांडाशी संबंधित उर्वरित शेवटच्या प्रकरणातही ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुरेंद्र कोळीची दोषसिद्धी रद्द करून त्याची निर्दोष मुक्तता केली आणि त्याला मुक्त करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीच्या दोषसिद्धीचा आधार असलेल्या पुराव्यांच्या ग्राह्यतेवरही प्रश्न उपस्थित केला होता. सुटकेनंतर हरिद्वारमध्ये स्थायिक झालेल्या कोळीचा अवघ्या काही महिन्यांत चहाच्या टपरीत मृत्यू झाल्याने निठारी प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here