जळगाव समाचार | ५ ऑगस्ट २०२६
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी मंगळवार, दि. ४ ऑगस्ट रोजी अमळनेर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
अमळनेर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामीण गृहनिर्माण अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी आरोग्य केंद्रातील स्वच्छतेची पाहणी केली तसेच औषधसाठा, उपलब्ध आरोग्य सुविधा आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संभाव्य साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणेने अधिक दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांना वेळेत व दर्जेदार उपचार मिळावेत, आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा, प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यापूर्वी पंचायत समिती येथे झालेल्या बैठकीत त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अपूर्ण घरकुले तसेच दुसरा व तिसरा हप्ता वितरित न झालेल्या प्रकरणांचा आढावा घेतला. घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देत कामकाजात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

![]()





