जळगाव समाचार | २७ एप्रिल २०२६
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून सोमवारी सकाळी मानराज पार्क चौफुली येथे भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ओम सुनील गिरी असे मृत तरुणाचे पूर्ण नाव असून या घटनेने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेला ओम गिरी हा आपल्या कामानिमित्त दुचाकीने जात असताना हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास ओम गिरी हा मानराज पार्क चौफुलीवरून दुचाकीने प्रवास करत होता. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की ओम गिरी ट्रकच्या चाकाखाली सापडला आणि गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटना घडताच स्थानिक नागरिक आणि इतर वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. मृत ओम गिरी हा जळगाव जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष रवींद्र गिरी यांचा पुतणे असल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे गिरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. मानराज पार्क चौफुली हा परिसर ‘डेथ ट्रॅप’ ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली असून येथे तातडीने स्पीड ब्रेकर, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा आणि जड वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

![]()




