बालकांनी सुप्त कलागुणांना वाव देणे गरजेचे! प्राथ. शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचे प्रतिपादन

 

जळगाव समाचार | २७ एप्रिल २०२६

बालकांच्या अंतर्गत दडलेल्या भावविश्वाला अभिव्यक्ती देण्यासाठी नाट्यकला हे अत्यंत प्रभावी माध्यम असून, त्यातून मुलांनी जीवनातील महत्त्वाचे धडे घेत आपली उद्दिष्टे साध्य करावीत, असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी केले. के.सी.ई. सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्रातर्फे २७ एप्रिल रोजी आयोजित बालनाट्य अभिनय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेचा उद्देश लहान मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. प्रवीणचंद्र जंगले, सांस्कृतिक संचालक शशिकांत वडोदकर, समन्वयक प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. शमा सराफ तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम हेमंत पाटील व सुषमा कंची उपस्थित होते. अ‍ॅड. प्रवीणचंद्र जंगले यांनी अभिनय ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य बाब असल्याचे सांगत, प्रत्येकाने आपल्या जीवनात अभिनयाची जाणीव ठेवावी, असे आवाहन केले. प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी कार्यशाळेचे नियोजन उत्कृष्ट असल्याचे नमूद करत, अशा उपक्रमांमुळे बालकांच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळते, असे मत व्यक्त केले.

कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भावना समजून घेऊन त्यांना सर्जनशीलतेने व्यक्त करण्याची संधी उपलब्ध झाली असून, या व्यासपीठाचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले. यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. वैभव मावळे, दिनेश माळी, कृतिका कोरे, कादंबरी चौधरी, धनश्री शिंपी, हिमानी पाटील, अमृता बोहरा, गोपाल मोरे, रोनक तडवी, मयूर तायडे, पवन निकम व अभय साळुंखे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसाद देसाई यांनी केले. दरम्यान, हेमंत पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचे सांगत, त्यांच्या निरागसतेतून प्रभावी व्यक्तिमत्त्व घडण्याचा विश्वास व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here