जळगाव समाचार | २१ ऑगस्ट २०२६
जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात किराणा दुकानासमोर वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन त्याचे दगडफेकीत रूपांतर झाल्याची घटना गुरुवारी रात्री सुमारे सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
प्राथमिक माहितीनुसार, सुप्रीम कॉलनीतील एका किराणा दुकानासमोर वाळू टाकण्यात आल्याने दुकान मालकाच्या मुलाचा एका व्यक्तीसोबत शाब्दिक वाद झाला. या वादानंतर काही तरुण एकत्र आल्याने तणाव वाढला आणि समोरील गल्लीत दगडफेक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटातील काही व्यक्तींनीही दगडफेक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांचे पथक तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) यांच्या आरसीपी पथकाने घटनास्थळी पोहोचून जमाव पांगवला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह अन्य उपलब्ध पुराव्यांची पडताळणी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतर दगडफेकीत सहभागी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या परिसरातील स्थिती शांत व सामान्य असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नयेत, तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

![]()




