मतदार यादी प्रमाणे पत्रकारांचा SIR झाला का ? पासमुळे महासभेतील पारदर्शकता फेल…

 

जळगाव समाचार | २२ ऑगस्ट २०२६

जळगाव महानगरपालिकेच्या महासभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या महासभेदरम्यान पत्रकारांना प्रवेशासाठी पास अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पास उपलब्ध नसल्याचे कारण देत अनेक पत्रकारांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला.

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या निर्णयाबाबत महापौर व आयुक्तांच्या स्तरावरील निर्देशांचा उल्लेख वारंवार केला. त्यामुळे पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यामागील नेमके कारण काय, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

महानगरपालिकेची महासभा ही शहराच्या विकासकामांशी, नागरिकांच्या प्रश्नांशी आणि विविध महत्त्वाच्या निर्णयांशी संबंधित असते. अशा बैठकींमध्ये माध्यमांची उपस्थिती ही पारदर्शकता आणि जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे पत्रकारांना प्रवेश नाकारल्याच्या प्रकारामुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत.

दैनंदिन उपक्रम, उद्घाटने किंवा इतर कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी सर्वच माध्यमांचे सहकार्य घेतले जाते. मात्र महत्त्वाच्या महासभेच्या वेळीच त्यांच्या प्रवेशावर निर्बंध का घालण्यात आले, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर महानगरपालिका प्रशासन, महापौर आणि आयुक्त यांची अधिकृत प्रतिक्रिया काय असणार, याकडे शहरातील नागरिकांसह पत्रकारितावर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा यासह कोर्टाच्या सुनावण्याही थेट प्रक्षेपित होतात, मात्र जळगाव शहर महानगरपालिका ही यापेक्षाही मोठी आहे का? अशा रीतीने पत्रकारांचाही SIR करून काहीनाच पत्रकारितेचा अधिकार आहे का आणि बाकीच्यांचा नाही का? असा संभ्रम अनेक पत्रकार बांधवांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here