जळगाव समाचार | १८ जुलै २०२६
दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून आमरण उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना प्रकृती खालावल्यानंतर दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर जंतरमंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईवर विरोधी पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी तीव्र आक्षेप घेत सरकारवर आंदोलन दडपण्याचा आरोप केला आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेली तडजोड आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचूक यांनी उपोषण सुरू केले होते. सलग २० दिवस अन्नत्याग केल्यामुळे त्यांचे सुमारे २० किलो वजन घटल्याचे सांगितले जात असून त्याचा परिणाम त्यांच्या स्नायूंवरही झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती चिंताजनक होत असतानाही त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार देत २० जुलै रोजी ‘चलो संसद’ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
शुक्रवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात वांगचूक यांनी नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतल्याच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाबाबत केंद्र सरकारला जबाबदार धरले पाहिजे, अशी भूमिका मांडली. या आंदोलनाला देशभरातील अनेक विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि विविध घटकांचा पाठिंबा मिळत असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सरकारी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने नियमित वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांच्या अहवालानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, उपोषणकर्त्याला आंदोलनस्थळावरून हटविण्याची ही कारवाई सरकारकडून लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून या प्रकरणामुळे केंद्र सरकारवर नव्याने टीकेची झोड उठली आहे.

![]()





