जळगाव जिल्ह्यात ४ लाख ८७ हजार मतदारांच्या नोंदी संशयाच्या फेऱ्यात “मतदारांनी यादीतील नावे तपासून त्रुटी असल्यास तातडीने BLOशी संपर्क साधावा” — जिल्हाधिकारी रोहन घुगे


जळगाव समाचार | १३ ऑगस्ट २०२६

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ८७ हजार ३८९ मतदारांच्या नोंदी प्रशासनाच्या तपासणीच्या फेऱ्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील मतदार यादी पडताळणीचे काम ९८.९९ टक्के पूर्ण झाले असले, तरी १३.७२ टक्के मतदारांचे गणनापत्रक (Enumeration Form) अद्याप बूथ लेव्हल ऑफिसरकडे (BLO) जमा झालेले नाही. त्यामुळे हे मतदार अनुपस्थित, स्थलांतरित, मयत किंवा दुबार नोंद असलेल्या प्रवर्गातील आहेत का, याची खातरजमा करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

महाराष्ट्र शासनाचे उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या ५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत BLOकडून घरोघरी जाऊन मतदारांच्या नोंदींची पडताळणी केली जात आहे. मात्र, मोठ्या संख्येने गणनापत्रके अद्याप प्राप्त झालेली नसल्याने संबंधित मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करणे प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दरम्यान, अनुपस्थित (Absent), स्थलांतरित (Shifted), मयत (Dead) आणि दुबार (Duplicate) अर्थात ASDD प्रवर्गातील मतदारांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय याद्या जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या याद्यांमध्ये आपले किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव आहे का, याची तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. एखाद्या मतदाराचे नाव चुकीने ASDD प्रवर्गात समाविष्ट झाले असल्यास संबंधित BLO किंवा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक गणनापत्रक भरता येणार आहे. त्यानंतर संबंधित नोंदीची पडताळणी करून आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

मतदारांची वाढती संख्या आणि मतदान केंद्रांवरील संभाव्य ताण लक्षात घेऊन जिल्ह्यात आणखी ३२ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यापूर्वी एका मतदान केंद्रावर कमाल १ हजार ५०० मतदारांची मर्यादा होती. आता ही मर्यादा १ हजार २०० मतदारांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन केंद्रांमध्ये चाळीसगाव येथे ९, जामनेर ५, चोपडा ४, मुक्ताईनगर, रावेर आणि भुसावळ येथे प्रत्येकी ३, एरंडोल आणि पाचोरा येथे प्रत्येकी २, तर जळगाव ग्रामीणमध्ये १ मतदान केंद्राचा समावेश आहे. याशिवाय पाच मतदान केंद्रांचे एकत्रीकरण करण्यात येणार असून, नऊ मतदान केंद्रे रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. २४ ऑगस्टपासून फॉर्म क्रमांक ६ चे वितरण सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मतदार यादीतील आपली नोंद सुरक्षित आणि अद्ययावत राहण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले नाव व संबंधित तपशील तपासणे आवश्यक आहे. नोंदीमध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित BLO किंवा निवडणूक अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा. विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी राबविण्यात येत असून, नागरिकांनी वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here