जळगाव समाचार | १५ ऑगस्ट २०२६
भुसावळ शहरातील एका तरुणाला मारहाण करून त्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या घटनेप्रकरणी भुसावळ शहर पोलिसांनी सिद्धेश महाडिक (वय १९) आणि सागर साळुंखे (वय २२) या दोघांना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांनाही बाल न्यायव्यवस्थेअंतर्गत ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडित तरुणाच्या आईने स्वातंत्र्य दिनी, १५ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय समारोहादरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने कारवाईचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत असून, त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ घटना २३ एप्रिल २०२६ रोजी घडली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात २४ एप्रिल रोजी रात्री ११.५८ वाजता गुन्हा रजिस्टर्ड क्रमांक ४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या घटनेचा व्हिडिओ अलीकडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर प्रकरण पुन्हा चर्चेत आले. पीडित तरुणाच्या आईने दिलेल्या पुरवणी जबाबासह व्हायरल व्हिडिओतील तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मूळ गुन्ह्यात वाढीव कलमांचा समावेश केला. त्यात BNS कलम १४०(१), १२७(२), तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(ई) आणि ६७ यांचा समावेश करण्यात आला आहे.
या कारवाईत सिद्धेश महाडिक आणि सागर साळुंखे यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर रिमांड प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय प्रकरणातील १७ वर्षे ११ महिने वयाच्या एका अल्पवयीन मुलासह दुसऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलावरही कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. दोघांनाही बाल न्यायव्यवस्थेअंतर्गत बाल सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलांची ओळख कायदेशीर कारणास्तव जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. पीडित तरुणाची आई तब्बल चार महिने न्यायाच्या प्रतीक्षेत होती. तिच्या म्हणण्यानुसार, या काळात तिला पोलिसांकडून अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि प्रकरण माध्यमांच्या माध्यमातून समोर आल्यानंतर प्रशासनाची यंत्रणा वेगाने हलली. अखेर स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय समारोहादरम्यान पीडिताच्या आईने थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर आपली आपबीती मांडली. पालकमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने कारवाईचे आदेश दिल्यानंतर काही तासांत आरोपींवर कारवाई झाल्याने, या प्रकरणात माध्यमांची जागरूकता आणि लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाला जाग आली, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीचा आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित करण्याच्या प्रकारांचीही पोलिसांकडून गंभीर दखल घेतली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला असून, उपलब्ध तांत्रिक पुरावे, कागदपत्रे आणि तपासातून समोर येणाऱ्या बाबींच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
चार महिने एका आईला न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागल्यानंतर माध्यमांमध्ये प्रकरण आल्यानंतर आणि पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर काही तासांत झालेली कारवाई हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर विचार करायला लावणारा प्रकार ठरला आहे. न्याय मिळवण्यासाठी पीडितेला प्रशासनाच्या दारात वारंवार हेलपाटे मारावे लागतात की, प्रकरण माध्यमांसमोर आल्यानंतरच यंत्रणा गतिमान होते, हा प्रश्न या घटनेने उपस्थित केला आहे.

![]()





