आरटीओ कार्यालयातील कामासाठी लाच घेताना खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात…

 

जळगाव समाचार | १८ ऑगस्ट २०२६

जळगाव शहरातील आरटीओ कार्यालयातील वाहन पासिंगचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खासगी एजंट योगेश रामभाऊ पाटील (वय ३१) याला सोमवारी रंगेहाथ पकडले. पाटील हा खांदेश मोटर्स शोरूम येथे काम करत असल्याची माहिती आहे.

जळगाव येथील एका खासगी वकिलाने या प्रकरणी एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदार हे दोन्ही पायांनी दिव्यांग असून त्यांनी ९ जुलै २०२६ रोजी खांदेश मोटर्समधून कार खरेदी केली होती. कारची आरटीओ कार्यालयात सीआरटीएम नोंदणी झाल्यानंतर कायमस्वरूपी पासिंगसाठी ते ३ ऑगस्ट रोजी आरटीओ कार्यालयात गेले होते. त्यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून काम करून देण्याचे सांगत योगेश पाटील याने १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ही रक्कम ८ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले.

तक्रारीची एसीबीकडून पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला. इच्छादेवी चौकातील बजाज टी.व्ही.एस. शोरूम येथे तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना योगेश पाटील याला पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील तसेच पोलीस हवालदार सुनील वानखेडे आणि पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here