जळगाव स्थानकावरून तोतया पोलीस तरुणी ताब्यात; चौकशीत बनावट कागदपत्रांसह धक्कादायक माहिती समोर…

 

जळगाव समाचार | १७ ऑगस्ट २०२६

स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून विवाहासाठी संभाव्य वरपक्षावर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पोलिसांनंतर थेट आरपीएफचा गणवेश परिधान केल्याचा प्रकार जळगाव रेल्वे स्थानकावर उघडकीस आला. १५ ऑगस्ट रोजी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर ‘ऑपरेशन सतर्क’अंतर्गत सुरू असलेल्या तपासणीदरम्यान संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला आरपीएफ कर्मचाऱ्यांनी हटकले. गणवेशावरील नेमप्लेटवर ‘मनिषा कविता युवराज गोपाल’ असे नाव असले तरी तिच्याकडे अधिकृत ओळखपत्र किंवा नियुक्तीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली नाहीत.

चौकशीदरम्यान संबंधित तरुणीने आपण आरपीएफमध्ये कार्यरत असून नाशिक येथे नियुक्ती असल्याचा दावा केला. आरपीएफ पथकाने तिच्या या दाव्याची नाशिकमधील संबंधित अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली असता, या नावाची कोणतीही महिला तेथे कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरच्या चौकशीत तिने आपले नाव मनिषा युवराज गोपाल (वय अंदाजे २१), रा. कापूसवाडी, ता. जामनेर, जि. जळगाव असल्याचे सांगितले.

अधिक चौकशी केल्यानंतर तरुणीने यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश परिधान करून छायाचित्रे काढल्याची माहिती दिली. विवाहाच्या उद्देशाने आपली सामाजिक ओळख आणि प्रतिष्ठा अधिक प्रभावी भासावी, यासाठी गणवेशाचा वापर केल्याचे तिने सांगितल्याचे आरपीएफकडून स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे तिच्याकडे बनावट चारित्र्य प्रमाणपत्र आणि पोलीस पडताळणीची प्रतही आढळून आली. त्यामुळे आरपीएफचा गणवेश परिधान करून ती जळगाव रेल्वे स्थानकात नेमक्या कोणत्या उद्देशाने आली होती, तसेच या कागदपत्रांचा वापर कुठे करण्यात आला आहे का, याबाबत तपास सुरू आहे.

घटनेची माहिती आणि संबंधित कागदपत्रे आरपीएफने पुढील कायदेशीर कारवाईसाठी जीआरपी, जळगावकडे सुपूर्द केली. या प्रकरणी जीआरपी, जळगावने एसीआर क्रमांक ६०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २०४ अंतर्गत १५ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा पुढील तपास जीआरपीकडून सुरू असून तरुणीने गणवेश आणि कथित बनावट कागदपत्रांचा वापर आणखी कुठे केला आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here