जळगाव समाचार | १३ जुलै २०२६
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात अनैतिक संबंधांच्या वादातून मित्राचाच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मयताला आधी दारू पाजून मोटारसायकलवरून शेतात नेण्यात आले आणि तेथे गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पसार झाले होते. मात्र रावेर पोलिसांनी तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि वेगवान कारवाईच्या आधारे अवघ्या काही दिवसांत या खुनाचा छडा लावत दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) व ३(५) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ९ जुलै रोजी रात्री ८ वाजल्यापासून ११ जुलै रोजी सकाळी १०.१५ वाजेपर्यंत घडल्याचे निष्पन्न झाले असून १२ जुलै रोजी दुपारी २.४१ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणी शेख सलमान शेख शब्बीर (वय २६, रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी गणेश संजय घोरपडे (वय २७, रा. भोर, ता. रावेर) आणि मेघराज वसंत सांगळे (वय २९, रा. भोर, ता. रावेर) या दोघांना आरोपी म्हणून निष्पन्न केले. पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश घोरपडे याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. एप्रिल २०२६ मध्ये ऐनपूर (ता. रावेर) येथे गावकऱ्यांनी आरोपीला मयताच्या पत्नीसोबत रंगेहात पकडून मारहाण केली होती. या घटनेचा राग मनात धरून आरोपीने मयताला, “माझे तुझ्या पत्नीवर प्रेम आहे; तू आडवा आलास तर तुला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी दिली होती. त्यानंतर मयताच्या पत्नीला नातेवाईकांनी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील आशीरगड येथे माहेरी पाठविल्याची माहिती तपासात समोर आली.
९ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी गणेश घोरपडे व मेघराज सांगळे यांनी मयताला दारू पाजून मोटारसायकलवरून नांदूरखेडा शिवारात नेले. तेथे दोघांनी संगनमताने हाताने गळा आवळून त्याची हत्या केली. खून केल्यानंतर मृतदेह शेतातच टाकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मृतदेह आढळून आल्यानंतर रावेर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेत घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या तपासात संशयित मेघराज सांगळे याला प्रथम ताब्यात घेण्यात आले. तर मुख्य आरोपी गणेश घोरपडे हा गुन्ह्यानंतर मध्य प्रदेशात पळून गेला होता. त्याचा शोध घेत पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांच्या पथकाने मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील जयशिनगर तहसीलमधील सागवानी येथे धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. अनैतिक संबंधांच्या वादातून घडलेल्या या खुनाचा अल्पावधीत उलगडा करण्यात रावेर पोलिसांना यश आल्याने त्यांच्या तपासाची परिसरात चर्चा होत आहे.

![]()





