जळगाव समाचार | ६ नोव्हेंबर २०२६
मराठी रंगभूमीला प्रतिभा, सर्जनशीलता आणि सामाजिक परिवर्तनाचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करण्यासोबतच रंगभूमीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात मराठी रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नटराज पूजन व रंगमंच पूजन करून रंगभूमीला अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नाटकातून मिळणारा अनुभव सिनेमातून मिळेलच असे नाही, असे प्रतिपादन करत रंगभूमी आणि नाट्यगृहे जिवंत ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, आमदार राजूमामा भोळे, नगरसेवक विष्णू भंगाळे, रुपाली वाघ यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराज प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर नटराज व रंगमंच पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांना भारतमातेची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जिल्हाधिकारी म्हणून जळगावात रुजू झाल्यानंतर बालगंधर्व नाट्यगृहाचा विषय पहिल्यांदा समोर आला होता. त्यावेळी मनाशी निश्चित केलेल्या विषयाच्या पूर्ततेच्या दिशेने आज वाटचाल होत असल्याचा आनंद आहे. नाटक हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून त्यातून प्रेक्षकांना मिळणारा अनुभव वेगळा असतो. हा अनुभव सिनेमातून मिळेलच असे नाही. त्यामुळे नाटकाची परंपरा टिकविण्यासाठी नाट्यगृहे जिवंत राहणे आणि कलावंतांना योग्य व्यासपीठ उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार राजूमामा भोळे यांनी बालगंधर्व नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित केला. जळगाव शहरातील रस्त्यांचा प्रश्न महत्त्वाचा असला, तरी स्थानिक कलावंतांना नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी योग्य आणि परवडणारे नाट्यगृह उपलब्ध होणेही तितकेच आवश्यक आहे. संभाजीराजे नाट्यगृहातील खर्च सर्वच कलावंतांना परवडणारा नसल्याने बालगंधर्व खुले नाट्यगृहाची दुरुस्ती होणे गरजेची होती त्यानुषंगाने पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी उचललेले पाऊल हे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले सोबतच पुढील रंगभूमी दिन नव्याने दुरुस्त झालेल्या बालगंधर्व खुले नाट्यगृहात साजरा करता येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक विष्णू भंगाळे आणि नगरसेवक हर्षल मावळे यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित रंगकर्मी आणि कलावंतांना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे यांनी केली.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सदस्या गीतांजली ठाकरे, चिंतामण पाटील, दुष्यंत जोशी, पियूष रावळ, दीपक चांदोरकर, विनोद ढगे, योगेश शुक्ल, रमाकांत भालेराव, नितीन देशमुख, दीपक भट, रमेश भोळे, प्रदीप भोई, महेंद्र खेडकर, चंद्रकांत पाटील, नितीन राजपूत, ओमप्रकाश शर्मा, अरविंद देशपांडे, अनिल मोरे, गौरव लवंगले, आकाश बाविस्कर, पवन खंबायत, जगदीश नेवे, सुभाष मराठे, विजय पाठक, संजय निकुंभ, राजेंद्र देशमुख, अशोक जोशी, राजेश पाटील, नेहा पवार, जय सोनार आदी रंगकर्मी उपस्थित होते. सूत्रसंचालन तुषार वाघुळदे आणि राजेंद्र देशमुख यांनी केले. तर आभार आकाश बाविस्कर यांनी मानले.
रंगभूमी दिनानिमित्त एकांकिका, नांदी आणि पद्य सादरीकरण
रंगभूमी दिनाच्या औचित्याने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अमोल ठाकूर लिखित व दिग्दर्शित ‘गाईड’ ही एकांकिका सादर करण्यात आली. शरद पांडे यांनी पद्य सादर केले. ‘पंचतुंड नररुंड मालधर’ ही नांदी दुष्यंत जोशी, यश देशपांडे, खुशी बागूल आणि प्रणाली बाविस्कर यांनी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तबल्यावर दर्शन गुजराथी यांनी साथसंगत केली. नाट्यगृहातील रांगोळी सजावटीसाठी कुमुद नारखेडे यांचे सहकार्य लाभले.

![]()







